गुवाहाटीचा ६५ लाखांचा अभ्यासदौरा पाण्यात?

गुवाहाटीचा ६५ लाखांचा अभ्यासदौरा पाण्यात?
Published on

६५ लाख खर्चूनही ‘शिस्त’ शिकली नाही?
गुवाहाटीतील प्रशिक्षणानंतरही महासभेत वाद, हाणामारी अन् खुर्चीचा ताबा
उल्हासनगर, ता. २० (वार्ताहर) : सभागृहातील शिस्त, प्रशासकीय कामकाज आणि लोकप्रतिनिधींच्या जबाबदाऱ्यांचे धडे देण्यासाठी उल्हासनगर महापालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांच्या गुवाहाटी प्रशिक्षण दौऱ्यावर तब्बल ६५ लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र, दौऱ्यानंतरच्या महासभांमध्ये आक्षेपार्ह वक्तव्यांचे आरोप, महापौरांच्या खुर्चीवरून वाद, सत्ताधाऱ्यांतील संघर्ष आणि दालनातील हाणामारीचे प्रकार घडल्याने या प्रशिक्षणाच्या फलितावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महापालिकेतील शिवसेना-भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना प्रशासकीय कामकाज, सभागृहातील शिस्त आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्याची प्रक्रिया समजावी, यासाठी हा प्रशिक्षण दौरा आयोजित केला होता. शहरातील ७६ पैकी ६१ नगरसेवकांनी या दौऱ्यात सहभाग घेतला. बहुतांश नगरसेवक प्रथमच निवडून आल्याने त्यांना महापालिकेच्या कामकाजाची दिशा मिळावी, या उद्देशाने दौरा आवश्यक असल्याची भूमिका महापौर अश्विनी निकम यांनी मांडली होती. महापालिकेने नगरसेवकांचा खर्च केला असून, नातेवाईक स्वखर्चाने आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. याप्रसंगी महापौरांना सभागृह चालवणे, सदस्यांना हाताळणे आणि वादांवर तोडगा काढण्याचे स्वतंत्र प्रशिक्षण देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरच्या महासभेतील प्रकारांनी या प्रशिक्षणाची लक्तरेच वेशीवर टांगली आहेत. भाजप नगरसेवक प्रधान पाटील यांनी महापौरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप झाला.
महासभा भोजनासाठी स्थगित होताच उपमहापौर अमर लुंड यांनी महापौरांच्या खुर्चीचा ताबा घेतला. तसेच यापूर्वी प्रधान पाटील आणि विपुल मयेकर यांच्या समर्थकांमध्ये महापालिकेतच सभापतींच्या दालनात बेदम हाणामारी झाली आणि महापालिकेच्या मालमत्तेचे नुकसान झाले. सत्तेत मांडीला मांडी लावून बसणारे भाजप आणि शिवसेना सभागृहात मात्र सातत्याने एकमेकांच्या अंगावर धावून जात आहेत. त्यामुळे शिस्त आणि लोकशाहीचे धडे शिकवणाऱ्या दौऱ्यावर खर्च झालेले ६५ लाख रुपये अक्षरशः पाण्यात गेले का, असा सवाल करदाते विचारत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com