‘उन्नत’साठी हरित जनपथाची माती

‘उन्नत’साठी हरित जनपथाची माती
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आनंदनगर ते साकेत उन्नत मार्गाचे काम सुरू झाले असले, तरी या प्रकल्पासाठी ठाण्याच्या हरित जनपथाची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली आहे. तीन हात नाका पट्ट्यातील जनपथावर ठिकठिकाणी खोदाई करून उन्नत मार्गाचे खांब उभारण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेल्या या हिरवळीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

२०१३ मध्ये ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांच्या संकल्पनेतून नितीन कंपनी ते तीन हात नाका या मार्गावर हरित जनपथ विकसित करण्यात आला होता. दोन्ही बाजूंना हिरवळ आणि मधोमध पदपथ अशी रचना असलेल्या या जनपथाचा सकाळ-सायंकाळ नागरिक फेरफटक्यासाठी वापर करत होते. इकडे वाहनांची वर्दळ तर दुसरीकडे हिरवळीने सजलेला जनपथमुळे ठाण्यात प्रवेश करताच सुखद अनुभव येत होता. शहरातील वाढत्या काँक्रीटीकरणाच्या काळात नागरिकांना मोकळी जागा आणि हिरवळ उपलब्ध करून देणारा हा पट्टा ठाण्याच्या महत्त्वाच्या सार्वजनिक जागांपैकी एक मानला जात होता, पण आता हा हरित पट्टा उन्नत मार्गामुळे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आनंदनगर ते साकेत असा ८.२४ किमीचा उन्नत मार्ग उभारण्यात येत आहे. आनंदनगर-साकेत उन्नत मार्गाची रुंदी सुमारे ४० मीटर असून, त्यावर प्रत्येकी तीन मार्गिका असणार आहेत. या प्रकल्पामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत करण्याचा उद्देश आहे. एमएमआरडीएने उन्नत मार्गाचे काम सुरू केले असून, सध्या तीन हात नाका ते नितीन कंपनीपर्यंत खांब उभारण्यास सुरुवात झाली आहे. मेट्रो चार मार्गिकेला लागून सेवा रस्त्यावर उन्नत मार्ग उभारण्याचे काम सुरू आहे.

तीन हात नाकावरून जाणाऱ्या पूर्व द्रुतगती मार्ग आणि सेवा रस्त्यामध्ये असलेल्या हरित जनपथची किनार यामुळे बाधित होत आहे. लोखंडी पत्रे आणि हिरवा पडदा लावून सध्या जनपथाच्या अनेक भागांत खोदाई करून खांब उभारले जात आहेत. त्यामुळे जनपथावरील हिरवळ, पदपथ आणि झाडांवर त्याचा थेट परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

२०२५ मध्ये माती परीक्षण
वास्तविक या मार्गासाठी २०२५ मध्ये या हरित जनपथावर माती परीक्षण करण्यात आले होते. त्या वेळी जनपथाला बाधा पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. आता प्रत्यक्ष प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर हा धोका सत्यात उतरल्याचे दिसून येत आहे.

प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
वाहतूक सुविधा निर्माण करताना शहरातील आधीच उपलब्ध असलेली हिरवळ किती प्रमाणात गमवावी लागणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. उन्नत मार्ग उभारणे गरजेचे असले, तरी त्यासाठी बाधित होणाऱ्या जनपथाचे आणि वृक्षांचे नेमके काय नियोजन करण्यात आले आहे, याबाबत प्रशासनाने स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. विशेषतः किती झाडे बाधित होणार, किती झाडांचे पुनर्रोपण होणार आणि जनपथाची पर्यायी हिरवळ कुठे विकसित केली जाणार, याकडे ठाणेकरांसह पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com