

गणेशोत्सवात निर्माल्याचे होणार खत
सहा विसर्जनस्थळी उपक्रम; साडेचारशेहून अधिक श्रीसदस्यांचा सहभाग
घाटकोपर ता. २० (बातमीदार) ः गणेशोत्सवातील श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम घडवत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने मुंबई उपनगरातील सहा प्रमुख गौरी-गणपती विसर्जनस्थळी ‘निर्माल्यापासून खतनिर्मिती’ हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. पद्मश्री डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि रायगड भूषण डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात मुंबई उपनगरातील साडेचारशेहून अधिक श्रीसदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
गणेशमूर्ती विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांनी पूजेसाठी आणलेले हार, फुले व अन्य निर्माल्य समुद्र, तलाव अथवा नदीमध्ये विसर्जित न करता प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांकडे जमा केले. भाविकांनीही या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देत निर्माल्य सुपूर्द केले आणि प्रतिष्ठानच्या पर्यावरण संवर्धनाच्या कार्याचे कौतुक केले.
प्रतिष्ठानच्या वतीने एम-पूर्व विभागातील ट्रॉम्बे जेटी, एम-पश्चिम विभागातील आशीष तलाव, घाटला गाव तलाव, एफ-नॉर्थ विभागातील वडाळा पश्चिम गार्डन, सायन तलाव तसेच एन वॉर्डमधील बर्वेनगर-गोळीबार पोलिस मैदान येथील कृत्रिम तलाव अशा सहा ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला.
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध समाजाभिमुख आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवून जनजागृती केली जाते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन, तलावांमधील गाळ काढणे, विहिरींचे संवर्धन, पावसाच्या पाण्याचे नियोजन, पाणी संकलन व साठवण अशा विविध उपक्रमांद्वारे प्रतिष्ठान सातत्याने कार्यरत आहे.
पर्यावरणाचे संरक्षण करण्यास हातभार
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर हार, फुले आणि अन्य निर्माल्य विसर्जनस्थळी जमा होते. हे निर्माल्य पाण्यात विसर्जित केल्यामुळे जलप्रदूषण होण्यासोबतच पाण्यातील जीवसृष्टीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी गणेश विसर्जनाच्या दिवशी निर्माल्य संकलित करून त्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती केली जाते. त्यामुळे धार्मिक श्रद्धेतून निर्माण होणाऱ्या निर्माल्याचा योग्य पद्धतीने पुनर्वापर होऊन पर्यावरणाचे संरक्षण करण्यास हातभार लागतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.