

कचरा होणार मौल्यवान संसाधन
१०० टक्के वर्गीकरण, लोकसहभागातून नवी मुंबई बनणार देशातील रोल मॉडेल
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २१ : स्वच्छता, नियोजनबद्ध विकास आणि शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहराने अधिक स्वच्छ आणि शाश्वत भविष्याकडे मोठे पाऊल टाकले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार पालिकेने घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ ची कालबद्ध व प्रभावी अंमलबजावणी करण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमामुळे प्रत्येक नागरिक शहराच्या स्वच्छतेचा भागीदार बनला आहे.
या नियमावलीनुसार कचरा वर्गीकरण ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून, ती प्रत्येक नागरिकाची सामाजिक आणि पर्यावरणीय बांधिलकी ठरत आहे. घराघरातून आणि स्रोत स्तरावरच कचऱ्याचे चार मुख्य प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाणार आहे. ओला कचरा हा अन्न, भाज्यांचे अवशेष, फळांची साले आणि बागेचा कचरा. सुका कचरा यात कागद, प्लॅस्टिक, काच आणि धातूच्या वस्तू. धोकादायक कचरा म्हणून बॅटरी, विजेचे बल्ब, औषधांचे खोके आणि ई-कचरा आणि सॅनेटरी कचरा म्हणजे वापरलेले डायपर आणि पॅड्स. स्रोत स्तरावरच १०० टक्के कचरा वेगळा केल्यामुळे कचरा संकलन अधिक सोपे, सुरक्षित आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी हितकारक ठरणार आहे.
चक्रीय अर्थव्यवस्था आणि पर्यावरणाचे रक्षण
स्रोत स्तरावर वर्गीकरण केल्यास ओल्या कचऱ्यापासून शास्त्रीय पद्धतीने खतनिर्मिती आणि बायो-मेथनेशनसारखी प्रक्रिया करून ऊर्जा मिळवता येते. सुक्या कचऱ्याचा पुनर्वापर करून मौल्यवान संसाधनांचे रक्षण होते. यामुळे कचरा डेपो किंवा क्षेपणभूमीवरील ताण लक्षणीयरीत्या कमी होणार असून, नवी मुंबईत चक्रीय अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.
मोठ्या कचरा उत्पादकांची आत्मनिर्भर भूमिका
दररोज १०० किलोहून अधिक कचरा निर्माण करणाऱ्या मोठ्या गृहनिर्माण संस्था, मॉल्स, हॉटेल्स, रुग्णालये आणि शैक्षणिक संकुलांना बल्क वेस्ट जनरेटर म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. अशा संस्था आता स्वतःच्या आवारातच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून शहरावर येणारा भार कमी करीत आहेत.
लोकसहभाग आणि परिवर्तनाचे दूत
स्थानिक लोकप्रतिनिधी, रहिवासी संघटना आणि नागरिक हे या परिवर्तनाचे मुख्य दूत म्हणून पुढाकार घेत आहेत. प्रशासकीय स्तरावर या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा स्तरावर विशेष निरीक्षण कक्ष स्थापन केले जात असून, महापालिका स्तरावर उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.