

नेरूळच्या कांदळवनाला मिळाले नवसंजीवनीचे वलय
एक टन कचरा हटवून तरुणाईने जपली सागरी जैवविविधता
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २० : समुद्राच्या लाटांची गाज, कांदळवनाची हिरवीगार झालर आणि त्या पार्श्वभूमीवर हातात ग्लोव्हज-पोती घेऊन उतरलेले शंभरहून अधिक तरुण. हा देखावा कुठल्या चित्रपटाचा नसून नवी मुंबईतील करावे जेट्टीवर घडलेल्या एका क्रांतीचा होता. आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस आणि जागतिक स्वच्छता दिनाचे औचित्य साधत एनव्हायरनमेंट लाइफ फाउंडेशनच्या वतीने सलग ३१८ व्या आठवड्यात कांदळवन स्वच्छता मोहिमेचा यज्ञ पार पडला.
या उपक्रमाने केवळ नेरूळच्या रामसर स्थळाजवळील कांदळवनाला मोकळा श्वास दिला नाही, तर सागरी परिसंस्थेचे रक्षण करण्यासाठी तरुणाईचा बुलंद आवाज राज्यासमोर मांडला. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या स्वच्छ सागर, सुरक्षित सागर ५.० या राष्ट्रीय अभियानाला समर्पित असलेल्या या उपक्रमात मुंबई प्रदेशातून स्थानिक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसह सुमारे १२५ उत्स्फूर्त स्वयंसेवक एकत्र आले होते. चिखलात पाय रोवून काम करत स्वयंसेवकांनी अवघ्या काही तासांत सागरी जैवविविधतेला घातक ठरणारा तब्बल एक टन कचरा कांदळवनातून बाहेर काढला. यामध्ये मुख्यत्वे शहरी नाले आणि सांडपाण्याच्या वाहिन्यांद्वारे थेट समुद्रात आलेला घरगुती टाकाऊ कचरा, प्लास्टिक पॅकेजिंग आणि एफएमसीजी वस्तूंचा समावेश होता. कचरा समुद्रात आणि कांदळवनात जाण्यापूर्वीच रोखण्यासाठी सर्व प्रमुख नाले आणि झोपडपट्टी परिसरातील वाहिन्यांवर ट्रॅश ट्रॅपर बसवावेत, अशी मागणी केली आहे.
सामूहिक प्रयत्नांची ताकद: १,३०० टनांहून अधिक कचरामुक्त किनारा
हा संपूर्ण उपक्रम मॅंग्रोव्ह फाउंडेशन, अर्थ डे नेटवर्क आणि नवी मुंबई महापालिका यांच्या मोलाच्या सहकार्याने पार पडला. एनव्हायरनमेंट लाइफ फाउंडेशनचा हा प्रवास एका मोहिमेपुरता मर्यादित राहिलेला नाही. आजपर्यंत या अखंड उपक्रमात एक लाख ३० हजारांहून अधिक नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला आहे. मुंबई, नवी मुंबई आणि रायगडच्या विस्तृत किनारपट्टीवरून तब्बल १,३०० टनांहून अधिक सागरी कचरा हटवून या टीमने पर्यावरणाच्या जतन-संवर्धनाचा एक ऐतिहासिक पायंडा पाडला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.