

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : भक्तिभावाने गणरायाला निरोप देताना ठाणे शहर शनिवारी (ता. १९) रात्री अक्षरशः दणाणून गेले. ‘डीजे’चा आवाज काहीसा कमी झाला असला, तरी ढोल-ताशे, बॅन्जो, ध्वनिक्षेपक आणि मोठ्या धातूच्या वाद्यांचा कानठळ्या बसविणारा गजर सुरूच राहिला. गौरी-गणपती विसर्जनाच्या मिरवणुकांदरम्यान विविध ठिकाणी करण्यात आलेल्या नोंदींमध्ये ध्वनीपातळी १०५ डेसिबलपर्यंत पोहोचल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, मागील वर्षांच्या तुलनेत आवाजाची तीव्रता कमी झाल्याचे चित्र दिसले नाही. त्यामुळे ‘डीजे’वर नियंत्रण आले असले, तरी ध्वनिप्रदूषणाचा राक्षस नव्या रूपात रस्त्यावर उतरल्याचे चित्र ठाण्यात दिसले.
राम मारुती रोडवर रात्री साडेनऊ वाजता ८५ ते ९० डेसिबल ध्वनीपातळी नोंदविण्यात आली. एकापाठोपाठ एक मिरवणुका या मार्गावरून जात होत्या. बहुतांश मिरवणुकांमध्ये ढोल-ताशे आणि बॅन्जोचा दणदणाट सुरू होता, तर सुमारे निम्म्या मिरवणुकांमध्ये ध्वनिक्षेपकांचा वापर करण्यात आला. एकत्रित मिरवणुकांमुळे या भागातील आवाजाची सरासरी पातळी ८५ ते ९५ डेसिबल होती. मागील काही वर्षांपासून विसर्जन मिरवणुकांमधील ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न कायम असतानाही यंदाच्या नोंदींमध्ये त्यात ठोस सुधारणा झालेली नसल्याचे दिसून आले.
रात्री वाढत गेला ‘आवाजाचा पारा’
रात्री १०च्या सुमारास पाचपाखाडी रोडवर ध्वनीपातळी ९० ते ९५ डेसिबल नोंदली गेली. ढोल-ताशांसोबत ‘डीजे’ आणि ध्वनिक्षेपकांचा वापर सुरू होता. त्यानंतर रात्री साडेदहा वाजता ठाणे महापालिका कचरेली सर्कल परिसरातही ९० ते ९५ डेसिबल आवाजाची नोंद झाली. येथे ढोल-ताशा आणि बॅन्जोचा कर्णकर्कश आवाज ऐकू येत होता.
रात्री ११ वाजता मात्र ध्वनिप्रदूषणाने आणखी गंभीर पातळी गाठली. आयसीआयसीआय बँकेजवळ १०० ते १०५ डेसिबल ध्वनीपातळी नोंदली गेली. तलावपाळी परिसरात रात्री साडेअकराच्या सुमारासही आवाजाचा दणदणाट थांबलेला नव्हता. येथे पुन्हा १०० ते १०५ डेसिबल ध्वनीपातळी नोंदली गेली.
‘डीजे’ची जागा आता धातूच्या वाद्यांनी!
यंदा हिंदी चित्रपटगीतांचा वापर काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसले, मात्र त्यामुळे ध्वनिप्रदूषणात घट झाली नाही. मोठे धातूचे वाद्य, ढोल-ताशा आणि अनेक ध्वनिक्षेपकांच्या एकत्रित आवाजाने रात्रीची शांतता भंग केली. ‘डीजे’ची जागा अनेक ढोल-ताशांनी घेतली आणि त्यात मोठ्या आकाराच्या धातूच्या नळीसदृश वाद्यांची भर पडली. त्यामुळे आवाजाचा कर्णकर्कशपणा कायम राहिला. काही मिरवणुकांमध्ये फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.
कानठळ्या बसविणारा उत्सव!
ध्वनिप्रदूषणाच्या या परिस्थितीवर भाष्य करताना डॉ. महेश बेडेकर यांनी उपरोधिक शब्दांत प्रतिक्रिया दिली. कानठळ्या बसणे, कानाचा पडदा फाटणे या मराठी संज्ञांचा अनुभव घ्यायचा असेल, तर विसर्जन मिरवणुकीत जरूर सहभागी व्हावे, अशी बोचरी टिप्पणी त्यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.