गणेशगल्लीत अवतरली पंढरी

गणेशगल्लीत अवतरली पंढरी
Published on

गणेशगल्लीत अवतरली पंढरी

‘मुंबईचा राजा’ कमळावर विराजमान; शतकपूर्तीकडे वाटचाल

मुंबई, ता. २० : विठ्ठलनामाचा गजर... चंद्रभागेचे पात्र... मंदिराचे उंच शिखर आणि समोर कमळावर विराजमान झालेला ‘मुंबईचा राजा’. गणेशगल्लीत पाऊल ठेवताच यंदा भाविकांना मुंबईत असूनही थेट पंढरपूरच्या पवित्र भूमीत पोहोचल्याचा अनुभव येत आहे. भक्ती, परंपरा आणि देखणेपणाचा अनोखा संगम साधून लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्लीने यंदाच्या गणेशोत्सवासाठी भव्य देखावा साकारला आहे.

मुंबईतील गणेशोत्सवाची भव्य परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या ‘लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली’चे हे ९९वे वर्ष. शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या मंडळाने यंदा आपल्या उत्सवाला वारकरी भक्तीची जोड दिली आहे. गणेशगल्लीत प्रवेश करताच कानावर पडतो तो विठ्ठलनामाचा गजर आणि नजरेसमोर उभा राहतो पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची भव्य प्रतिकृती.
मंदिराची सुबक प्रतिकृती, उंच शिखर, खांबांवरील पारंपरिक कोरीव काम आणि चंद्रभागेच्या पात्राचा हुबेहूब देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. या भक्तिमय वातावरणात महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे दर्शनही घडते. संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानदेव आणि संत एकनाथ यांच्या कार्याची माहिती देणारा माहितीपट येथे मांडण्यात आला आहे. त्यामुळे गणेशगल्लीत यंदा केवळ गणेशदर्शन नव्हे, तर वारकरी संप्रदायाच्या समृद्ध परंपरेचा अनुभवही भाविकांना मिळत आहे. या साऱ्या देखाव्याचा केंद्रबिंदू मात्र आहे तो ‘मुंबईचा राजा’. नेहमीप्रमाणे २२ फूट उंच आणि रुबाबदार मूर्ती यंदा आकर्षक कमळावर विराजमान झाली आहे. तेजस्वी आणि मनमोहक रूपातील राजाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईसह राज्याच्या विविध भागांतून भाविक गणेशगल्लीत दाखल होत आहेत. शतकपूर्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गणेशगल्लीत यंदा मुंबईच्या राजासोबत पंढरीच्या विठुरायाचीही अनुभूती मिळत आहे. त्यामुळे गणेशगल्लीतील हा उत्सव यंदा भक्ती आणि परंपरेच्या अनोख्या संगमाचे केंद्र ठरला आहे.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com