वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या कामाचा श्रीगणेशा?

वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या कामाचा श्रीगणेशा?
Published on

वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या कामाचा श्रीगणेशा?
तीन महिन्यात काम सुरू करण्याचे महापालिकेचे उच्च न्यायालयात आश्वासन
तुर्भे, ता. २० (बातमीदार) ः तुर्भे क्षेपणभूमीवरील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचे काम रखडल्याने मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेवर नुकतीच सुनावणी पार पडली. यादरम्यान येत्या तीन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन नवी मुंबई पालिकेने उच्च न्यायालयाला दिले आहे. त्यामुळे या प्रकल्पाला लवकरच गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवी मुंबईतील क्षेपणभूमीवर वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राबवण्यासाठी नवी मुंबई पालिकेने कंबर कसली आहे. तुर्भेतील क्षेपणभूमीवर हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी मे. टंडन असोसिएट्स या तांत्रिक सल्लागाराची नेमणूक केली असून, एकात्मिक प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर विकसित करण्यासाठी मेरारो आर अँड बी ग्रीनटेक एलएलपी या संस्थेला लेटर ऑफ अवार्ड एल (एलओए) देण्यात आले. सुमारे २१०० कोटी खर्चाच्या या प्रकल्पातून २७ मेगावॉट प्रतिदिन विद्युत निर्मिती प्रस्तावित आहे. कंत्राटदाराला कार्यादेश देऊन १० महिने उलटले तरी याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग तीर्थे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. ११ सप्टेंबर रोजी न्यायालयात झालेल्या सुनावणीत आपण या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करू, असे आश्वासन पालिकेने न्यायालयाला दिले. न्यायालयानेही पालिका तीन महिन्यात कामाची सुरुवात करेल, अशी अपेक्षा आदेशात व्यक्त करून याचिका निकाली काढली.

प्रदूषणाचा मुद्दा
स्थानिक नेत्यांनी विरोध दर्शवल्याने हा प्रकल्प आजतागायत कार्यान्वित झालेला नाही. कचरा जळताना निर्माण होणाऱ्या धुरामुळे अनेकांना श्वसनविषयक आजार निर्माण होण्याची भीती नरसेवकांनी व्यक्त केली आहे. याबाबत शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्याशी विचारणा केली असता अशा प्रकारचे प्रकल्प हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात येत असून, निर्माण होणाऱ्या धुरावर प्रक्रिया करून ते १०० मीटरहून अधिक उंचीच्या धुरांड्यातून वर सोडले जातात. त्यामुळे अशा प्रकल्पातून प्रदूषण व त्याचा मानवी आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. स्थानिक नेत्यांनी मात्र आरदवाड यांच्या विरोधात भूमिका घेऊन हा प्रकल्प इतर ठिकाणी कार्यान्वित करावा, अशी मागणी करून क्षेपणभूमीवर कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प उभारू देणार नाही, अशा इशारा दिला आहे.

प्रकल्पासाठी कार्याध्यक्ष देऊन १० महिने उलटले तरी कामाला सुरुवात झाली नसल्याने मी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आता महापालिकेनेच न्यायालयात दिलेल्या आश्वासानंतरही प्रकल्पाचे काम तीन महिन्यांत सुरू झाले नाही, तर न्यायालयात अवमान याचिका दाखल करू व या प्रकल्पास विरोध करून पालिकेचे अहित करणाऱ्या नेत्याचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी करू.
- पांडुरंग गोविंद तीर्थे सामाजिक कार्यकर्ता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com