

सामाजिक न्यायासाठी सर्वधर्मीयांनी एकत्र यावे
बॉम्बे कॅथोलिक सभेच्या आंतरधर्मीय संवाद मेळाव्यात संविधान, समानता आणि धार्मिक स्वातंत्र्यावर चर्चा
मुंबई, ता. २१ (बातमीदार) : सामाजिक न्याय, समानता, बंधुभाव आणि शांततापूर्ण संवादाला चालना देण्यासाठी बॉम्बे कॅथोलिक सभेच्या वतीने गोरेगाव पूर्व येथे आंतरधर्मीय संवाद मेळावा पार पडला. ‘सामाजिक न्यायासाठी सहकार्य’ या विषयावर झालेल्या या कार्यक्रमात विविध धर्मांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत सामाजिक प्रश्नांवर शांततामय मार्गाने काम करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात बीसीएस अँथमने झाली. सेंट जोसेफ बीसीएस युनिटचे अध्यक्ष ग्लेन सुआरेस यांनी स्वागतपर भाषण केले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, खान अब्दुल गफ्फार खान, संत फ्रान्सिस ऑफ असीसी आणि महात्मा गांधी यांच्या कार्याचा उल्लेख करीत समानता, सामाजिक न्याय आणि मानवी प्रतिष्ठेचे महत्त्व अधोरेखित केले.
बॉम्बे कॅथोलिक सभेचे डीनरी कौन्सिलर प्रकाश नोरोंहा यांनी सर्वधर्मीयांनी सामाजिक न्यायासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. मतदार नोंदणी, युवक शिक्षण, करिअर मार्गदर्शन, नागरिक सहभाग आणि पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रमानंतर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मान्यवरांच्या हस्ते कॉन्व्हेंट परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. ‘वेगवेगळे धर्म, परंपरा आणि दृष्टिकोन असले तरी पृथ्वी आणि आपले सामायिक घर एकच आहे,’ असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
बीसीएसचे प्रवक्ते डॉल्फी डिसुझा यांनी विविध समाजांमध्ये संवादाची दारे खुली ठेवून संविधान समजून घेणे आणि सामाजिक न्यायासाठी शांततामय मार्गाने एकत्र काम करण्याचे आवाहन केले. फादर सुंदर अल्बुकर्क यांनी उपस्थितांचे आभार मानले. या वेळी बॉम्बे कॅथोलिक सभेचे अध्यक्ष नॉर्बर्ट मेंडोंका, फादर मारिओ मेंडिस, फादर कॉनरॅड पेसो एस. जे., सिस्टर एस. जेनिफर ग्रेग यांच्यासह विविध मान्यवर आणि नन्स उपस्थित होत्या. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
धर्माची निवड करण्याचा प्रत्येकाला अधिकार
चर्चासत्रात डॉ. हर्षा बडकर, ॲड. इरफान इंजिनिअर, फादर एस. एम. मायकेल आणि डॉ. गौतम निकम यांनी विविध धर्मांच्या दृष्टिकोनातून समानता, जातीय भेदभाव, संविधानिक हक्क, धार्मिक स्वातंत्र्य, वंचित घटकांचे अधिकार आणि सामाजिक न्याय या विषयांवर विचार मांडले. जबरदस्तीच्या धर्मांतराला विरोध करताना प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माची निवड व आचरण करण्याचा अधिकार असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.