

एसआयआरमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत दावे, हरकती नोंदवा
नवी मुंबई महापालिकेचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २१ : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत व पारदर्शक करण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबवली जात आहे. याअंतर्गत सुधारित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, नागरिकांना आपले दावे व हरकती नोंदवण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. प्राप्त झालेल्या सर्व दाव्यांचा व हरकतींचा २९ ऑक्टोबरपर्यंत निपटारा करून ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
या मोहिमेत नागरिकांना मतदार यादीतील नोंदीबाबत विविध अर्जांद्वारे सुधारणा करण्याची संधी उपलब्ध आहे. मतदार यादीत नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी अथवा नाव सुटलेल्या पात्र नागरिकांसाठी अर्ज नमुना ६, दुबार किंवा चुकीच्या नावांवर हरकत घेण्यासाठी अथवा नाव वगळण्यासाठी अर्ज नमुना ७, तर नाव, वय, पत्ता किंवा छायाचित्र यांमधील दुरुस्ती व बदलांसाठी अर्ज नमुना ८ उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिक हे अर्ज मतदार नोंदणी अधिकारी अथवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन ऑफलाइन पद्धतीने जमा करू शकतात. तसेच घरबसल्या अर्ज करू इच्छिणाऱ्या मतदारांसाठी निवडणूक आयोगाच्या वोटर सर्विस पोर्टल, ईसीआयएनईटी मोबाईल ॲप आणि वोटर हेल्पलाइन ॲप या ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नवी मुंबई पालिका क्षेत्रातील ज्या मतदारांना यादीत नाव नोंदवायचे आहे किंवा तपशिलात दुरुस्ती करायची आहे त्यांनी या राष्ट्रीय मोहिमेत वेळेत सहभाग घ्यावा. विशेषतः १८ वर्षे पूर्ण केलेल्या नवतरुणांनी ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी आपले दावे व हरकती सादर करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.