

परळमध्ये अवतरली पंढरीची वारी
वारकऱ्याच्या रूपातील पांडुरंगाचे भव्य दर्शन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरची वारी अनुभवण्याची इच्छा असलेल्या मात्र प्रत्यक्ष वारीला जाता न येणाऱ्या भाविकांसाठी यंदा परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ‘परळचा राजा’च्या माध्यमातून पंढरीची वारीच परळमध्ये अवतरवली आहे. वारकऱ्याच्या भूमिकेतील पांडुरंगाचे तब्बल २३ फूट उंच भव्य रूप हे यंदाच्या गणेशोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरले आहे.
परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा वारकऱ्याच्या भूमिकेतील पांडुरंग ही संकल्पना साकारण्यात आली आहे. पंढरपूरच्या वारीतील भक्ती, परंपरा आणि वारकऱ्यांची संस्कृती यांचा अनुभव मुंबईतील भाविकांना मिळावा, हा या संकल्पनेमागील उद्देश असल्याचे मंडळाचे अध्यक्ष अभिषेक परब यांनी सांगितले.
यंदाच्या मूर्तीमध्ये पांडुरंगाला पारंपरिक वारकऱ्याच्या रूपात साकारण्यात आले आहे. हातात वीणा, चिपळ्या आणि मृदंगाची साथ देणारे वारकरी वातावरण, तसेच पारंपरिक पगडी अशा विविध वैशिष्ट्यांमधून संपूर्ण वारीची अनुभूती मूर्तीमध्ये निर्माण करण्यात आली आहे. यंदाची मूर्ती तब्बल २३ फूट उंच असून, तिच्या दर्शनासाठी मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांतून भाविक येत आहेत.
रंगला रिंगण सोहळा
‘परळचा राजा’च्या आगमन सोहळ्यात यंदा पारंपरिक रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. वारकऱ्यांच्या रिंगणाची अनुभूती देण्यासाठी अश्वासह हा सोहळा पार पडला. पांडुरंगाभोवती अश्व फिरवून रिंगण साकारण्यात आले. त्यानंतर वारकरी परंपरेतील विविध धार्मिक आणि सांस्कृतिक विधी पार पाडण्यात आले.
मूर्तीच्या निर्मितीसाठी सहा महिन्यांपासून तयारी
‘परळचा राजा’ची मूर्ती साकारण्यासाठी सुमारे सहा महिन्यांपूर्वीपासून तयारी सुरू करण्यात आली होती. विविध संकल्पनांची रेखाचित्रे तयार करून त्यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर मूर्तीकार निखिल राजन खातू यांनी ही मूर्ती घडवली आहे. वीणा, चिपळ्या, मृदंग, पारंपरिक पगडी आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विविध घटकांचा समावेश या मूर्तीसाठी करण्यात आला.
आपत्तीच्या काळात सामाजिक बांधिलकी
मंडळाने यापूर्वी विविध आपत्तींच्या काळात सामाजिक बांधिलकी जपली आहे. कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुराच्या काळात मंडळाने एका गावातील नागरिकांना सुमारे एक महिन्याचा शिधा उपलब्ध करून दिला होता. चिपळूणमध्ये आलेल्या महापुराच्या काळात स्थानिक नागरिकांना आर्थिक मदत करण्यात आली. घरांचे नुकसान झालेल्या कुटुंबांना त्यांच्या परिस्थितीनुसार २० हजार ते २५ हजार रुपयांपर्यंत मदत देण्यात आल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.