

सरकारी रुग्णालयांत सिझेरियनचा वाढता भार
सामान्य प्रसूतीचे प्रमाण घटले; चार वर्षांत सिझेरियनचे प्रमाण ५६.०५ टक्क्यांवर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : राज्यातील मोठ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये सिझेरियन प्रसूतीचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत असल्याचे समोर आले आहे. २०२२ मध्ये ४९.६ टक्के असलेले सिझेरियनचे प्रमाण २०२५ मध्ये ५६.०५ टक्क्यांवर पोहोचले आहे. याउलट, याच कालावधीत नॉर्मल प्रसूतीचे प्रमाण ५०.३४ टक्क्यांवरून ४३.९५ टक्क्यांपर्यंत घसरले आहे.
तज्ज्ञांच्या मते, मोठ्या रुग्णालयांतील या वाढत्या प्रमाणाकडे केवळ आकडेवारी म्हणून न पाहता तेथील रुग्णांची परिस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. ग्रामीण व उपनगरीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि खासगी रुग्णालयांतून गुंतागुंतीची प्रकरणे मोठ्या रुग्णालयांकडे पाठवली जातात. त्यामुळे येथे सिझेरियनचे प्रमाण अधिक दिसते.
सिझेरियन वाढण्याची मुख्य कारणे
पहिल्यांदा सिझेरियन ठरते महत्त्वाचे ः मोठ्या रुग्णालयांत दाखल होणाऱ्यांपैकी ४० ते ५० टक्के महिलांचे आधीच एक किंवा दोन सिझेरियन झालेले असते. अशा प्रकरणांत सुरक्षिततेसाठी पुन्हा सिझेरियनचा निर्णय घ्यावा लागतो.
शेवटच्या टप्प्यात रेफरल ः उच्च रक्तदाब, झटके येण्याची शक्यता, गर्भाची वाढ खुंटणे, गर्भजल कमी होणे, गर्भाशयाच्या मुखाजवळ नाळ येणे, आयव्हीएफद्वारे झालेली गर्भधारणा, जुळी गर्भधारणा तसेच अधिक वयातील गर्भधारणा यांसारख्या जोखमीच्या प्रकरणांचा मोठ्या रुग्णालयांकडे ओघ असतो. काही वेळा प्रसूतीच्या शेवटच्या टप्प्यात आई किंवा बाळाची स्थिती गंभीर झाल्यानंतर रुग्णाला मोठ्या रुग्णालयात हलविले जाते. अशा परिस्थितीत जीव वाचविण्यासाठी तातडीने सिझेरियन करावे लागू शकते.
प्रसूतीची प्रगती न झाल्यास शस्त्रक्रिया ः प्रसूतीकळा सुरू होऊनही प्रक्रिया पुढे न सरकणे, गर्भाला त्रास होणे, संसर्ग किंवा इतर गुंतागुंत निर्माण होणे यामुळे आपत्कालीन सिझेरियनची गरज भासू शकते. काही प्रकरणांत प्रसूतीची प्रगती आठ ते बारा तासांत अपेक्षेप्रमाणे न झाल्यास शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला जातो.
वैद्यकीय कारणांसोबत सामाजिक घटक ः गर्भवतीचे वाढते वय, लठ्ठपणा, गर्भावस्थेतील मधुमेह, उच्च रक्तदाब, आयव्हीएफ, जुळी गर्भधारणा आदी वैद्यकीय कारणांबरोबरच प्रसूतीकळांची भीती, प्रसूती लवकर व्हावी अशी अपेक्षा, प्रसूतीनंतरच्या शारीरिक बदलांविषयीची चिंता यांसारखे सामाजिक घटकही काही प्रकरणांत सिझेरियनच्या निर्णयावर परिणाम करू शकतात.
‘सिझेरियनचा निर्णय वैद्यकीय गरजेनुसारच हवा’
मोठ्या रुग्णालयांमध्ये येणाऱ्या गर्भवतींपैकी अनेक महिला आधीच एक किंवा दोन सिझेरियन झालेल्या असतात. अनेकदा उच्च जोखमीच्या गर्भधारणांची प्रकरणे मोठ्या प्रमाणात रेफर केली जातात. त्यामुळे या रुग्णालयांतील सिझेरियनचे प्रमाण पाहताना तेथील रुग्णांचा जोखीम स्तरही लक्षात घ्यावा, असे कामा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले. गर्भधारणेच्या ३७-३८ आठवड्यांत वैद्यकीय कारण नसताना सिझेरियन केल्यास काही नवजात बाळांना श्वसनाशी संबंधित अडचणी निर्माण होऊ शकतात. अशा वेळी नवजात अतिदक्षता विभागात उपचारांची गरज लागू शकते. त्यामुळे सिझेरियनची वेळ आणि गरज ठरविताना गर्भावस्थेचा कालावधीही महत्त्वाचा ठरतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.