सीवूड्स रेल्वे स्थानकात प्रवाशांची गैरसोय

सीवूड्स रेल्वे स्थानकात प्रवाशांची गैरसोय
Published on

सीवूड्स स्थानकाला समस्यांचे ग्रहण
सुरक्षसेसह मूलभूत सुविधांचा बोजवारा; प्रवाशांमध्ये नाराजी
जुईनगर, ता. २१ (बातमीदार) : सीवूड्स रेल्वे स्थानकाला विविध समस्यांचे ग्रहण लागले आहे. दुर्गंधीयुक्त शौचालये, बंद पंखे, अपुरा प्रकाश, पार्किंग व सबवेमधील अस्वच्छता आणि सुरक्षेचा अभाव यामुळे प्रवाशांना दररोज नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे आणि सिडको प्रशासनाने देखभाल-दुरुस्तीसह प्रवाशांच्या सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सीवूड्स रेल्वे स्थानकातील शौचालयांची नियमित स्वच्छता होत नसल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, काही ठिकाणी पाण्याची उपलब्धता नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. स्थानकातील पंखे तसेच विद्युत दिवे बंद असल्याने विशेषतः गर्दीच्या वेळेत प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. पार्किंग परिसरात आणि भुयारी मार्गातही अस्वच्छता व विजेची अपुरी व्यवस्था नसल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. सीवूड्स रेल्वे स्थानकातील समस्या सिडको आणि रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास वारंवार आणूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. सिडको व रेल्वे प्रशासनाने स्थानकाची पाहणी करून सुविधांचा सर्वंकष आढावा घ्यावा. तसेच आवश्यक त्या ठिकाणी मनुष्यबळ वाढवून प्रवाशांना सुरक्षित आणि सुविधायुक्त प्रवासाचे वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

अपुऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गंभीर प्रश्न
१ स्थानक परिसरात आवश्यक त्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी उपलब्ध नसल्याने गैरप्रकारांना आळा घालण्यात अडचणी निर्माण होत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याबाबत रेल्वे प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याची नाराजी प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
२ स्थानकातील तिकीट व्यवस्थेवरही अपुऱ्या कर्मचारीवर्गाचा परिणाम होत आहे. तीन ते चार तिकीट खिडक्या उपलब्ध असतानाही अनेक वेळा केवळ एकच खिडकी सुरू असते. यामुळे प्रवाशांना रांगेत ताकळत उभे राहावे लागते. परिणामी, कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी तसेच इतर प्रवाशांचा वेळ वाया जात असून मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पत्रव्यवहार सुरू
सीवूड्स रेल्वे स्थानकावर आम्हाला जाणवत असलेल्या किंवा माहिती मिळालेल्या समस्यांबाबत सिडको प्रशासनाकडे पत्र व्यवहार केला आहे. तसेच आमचा पाठपुरवादेखील सुरू आहे, अशी माहिती सीवूड्स स्थानक मास्तर के. राजेश यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com