

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २२ : गणेशोत्सव आणि कोकणातील लोककलेचे नाते जुने आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे आणि डिजिटल मनोरंजनाच्या वाढत्या प्रभावामुळे पारंपरिक लोककलांचे कार्यक्रम कमी होत असताना ठाणे तालुक्यातील नारीवली गावाने मात्र बाळ्या नाचाची परंपरा आजही जपली आहे. विशेष म्हणजे, एका कुटुंबातील तीन पिढ्या या लोककलेच्या सादरीकरणात सहभागी होत असून, सत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठांपासून अवघ्या १४ वर्षांच्या नातवापर्यंत कलाकार एकाच तालावर थिरकत असल्याचे चित्र गावात पाहायला मिळते.
नारीवलीतील बाळ्या नाचाची परंपरा ज्येष्ठ शाहीर-कवी दिवंगत लडकू महादू पाटील आणि वादक दिवंगत कमळू उंदऱ्या पाटील यांनी समृद्ध केली. त्यांच्या कलेचा वारसा पुढील पिढ्यांनीही जपला आहे. ज्येष्ठ कवी सावळाराम हाशा पाटील यांच्या गायनातून आजही बाळ्या नाचाला पारंपरिक रंग चढतो. त्यांना त्यांचे बंधू काशिनाथ पाटील, वामन पाटील, मुलगा सुभाष पाटील आणि १४ वर्षांचा नातू चेतक पाटील यांची साथ लाभते. त्यामुळे एकाच कुटुंबातील तीन पिढ्या लोककलेच्या माध्यमातून एकत्र येत असल्याचे दुर्मीळ चित्र येथे पाहायला मिळते.
बदलत्या जीवनशैलीमुळे आणि डिजिटल मनोरंजनाच्या वाढत्या प्रभावामुळे या कला हळूहळू दुर्मीळ होत आहेत. अशा परिस्थितीत नारीवलीतील कलाकारांनी ही परंपरा जिवंत ठेवली आहे. मोहन पाटील, जयेंद्र पाटील, कैलास पाटील, रामकृष्ण पाटील, शरद पाटील, गणेश पाटील यांच्यासह अनेक कलाकार या सांस्कृतिक उपक्रमात सहभागी होत आहेत.
वादनाची सुरेल साथ
बाळ्या नाचात गायन आणि नृत्याइतकेच वाद्यवृंदालाही महत्त्व आहे. दिवंगत बाळाराम गोविंद पाटील यांच्या वादनाचा वारसा त्यांचा मुलगा नरेश पाटील आणि नातू आदित्य पाटील पुढे नेत आहेत. गायन आणि वादनाच्या सुरेल साथीमुळे बाळ्या नाचाची रंगत अधिक खुलते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.