

दुःखातही माणुसकीचा निर्णय
५६ वर्षीय महिलेच्या अवयवदानातून अनेकांना जीवदान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : एका ५६ वर्षीय महिलेच्या अवयवदानाच्या निर्णयामुळे गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या अनेक रुग्णांना नवजीवनाची आशा मिळाली. या महिलेवर मुंबईतील एच. एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात उपचार सुरू होते.
रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या या महिलेच्या डोक्याला दुखापत झाली होती. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती सुधारू शकली नाही. त्यानंतर कुटुंबीयांच्या संमतीने अवयवदानाची प्रक्रिया पुढे नेण्यात आली. महिलेचे यकृत आणि एक मूत्रपिंड एच. एन. रिलायन्स रुग्णालयात प्रत्यारोपित करण्यात आले, तर दुसरे मूत्रपिंड, कॉर्निया, त्वचा आणि हाडे शहरातील अन्य गरजू रुग्णांसाठी दान करण्यात आली. महिलेच्या यकृताचे प्रत्यारोपण गंभीर यकृत विकाराने त्रस्त असलेल्या ५६ वर्षीय महिला प्राध्यापकावर करण्यात आले. त्या गेल्या दोन वर्षांपासून यकृत प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत होत्या. योग्य दाता मिळाल्यानंतर त्यांच्यावर यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. याचप्रमाणे, ४८ वर्षीय व्यक्ती गेल्या सात वर्षांपासून डायलिसिसवर होते आणि मूत्रपिंड निकामी झाल्याने त्रस्त होते. त्यांना दात्याचे मूत्रपिंड मिळाल्यानंतर त्यांचेही प्रत्यारोपण करण्यात आले. एका अपघातामुळे एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला; मात्र त्याच कुटुंबाने घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे अनेक अनोळखी रुग्णांना नव्या आयुष्याची संधी मिळाली. अवयवदानाचे महत्त्व अधोरेखित करणारी ही घटना ठरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.