‘भुताचा गणपती’ सांगणार भेसळीची कथा

‘भुताचा गणपती’ सांगणार भेसळीची कथा
Published on

‘भुताचा गणपती’ सांगणार भेसळीची कथा
इलेव्हन इव्हिल्स मंडळाकडून जनजागृतीचा प्रयत्न
धारावी, ता. २२ (बातमीदार) : खाद्यपदार्थ आणि पेयांमधील भेसळीविरोधात महाराष्ट्रात सुरू असलेल्या कारवाईवर भाष्य करणारा देखावा धारावीतील संत कक्कय्या मार्गावरील कवडे चाळ येथील इलेव्हन इव्हिल्स क्रिकेट क्लबने साकारला आहे. मंडळाच्या ४१व्या गणेशोत्सवानिमित्त उभारण्यात आलेल्या या देखाव्यातून भेसळीविरोधातील कारवाई आणि त्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
मंडळाने यंदा पर्यावरणपूरक १५ फूट उंचीची कागदी गणेशमूर्ती प्रतिष्ठापित केली आहे. मंडळाचा गणपती ‘भुताचा गणपती’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. सुरुवातीच्या काळात मंडपात अंधार करून भुयारी मार्गातून भाविकांना दर्शनासाठी सोडले जात असे. या मार्गात लहान मुलांना भुताचा वेष देऊन उभे केले जात होते. अंधारातून मार्गक्रमण करताना अचानक समोर येणाऱ्या भुतांमुळे भाविक दचकत असत. त्यामुळे मंडळाला धारावीत अल्पावधीतच प्रसिद्धी मिळाली.
त्यानंतर मंडळाने सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारे देखावे साकारण्याची परंपरा सुरू केली. यंदा महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भेसळखोरांविरोधात सुरू असलेल्या कारवाईची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. देखाव्यासोबतच यासंदर्भातील माहितीपटही दाखविण्यात येत आहे.
भेसळयुक्त खाद्यपदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन विविध आजारांना सामोरे जावे लागते. भेसळखोरीविरोधातील कारवाईची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि त्याबाबत जनजागृती व्हावी, हा या देखाव्यामागील उद्देश आहे, असे मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण घाणेलू यांनी सांगितले. मंडळाचे संस्थापक दिवंगत पत्रकार व समाजसेवक अरविंद कटके यांनी सामाजिक विषयांवरील देखाव्याची ही परंपरा सुरू केली. त्यांच्या पश्चात साईराज कटके, साईसंकेत कटके आणि मंडळाचे कार्यकर्ते ही परंपरा पुढे नेत आहेत. अध्यक्ष लक्ष्मण घाणेलू, सचिव साईराज कटके, खजिनदार विजय जंगम, सल्लागार साईसंकेत कटके यांच्यासह कार्यकर्ते गणेशोत्सवाच्या तयारीसाठी परिश्रम घेत आहेत.

सामाजिक विषयांवर देखावे
यापूर्वीही मंडळाने महिलांचे प्रश्न, पर्यावरण आदी सामाजिक विषयांवर देखावे साकारले आहेत. धारावीत सामाजिक विषयांवर देखावे उभारणाऱ्या मोजक्या मंडळांमध्ये इलेव्हन इव्हिल्स क्रिकेट क्लबचा समावेश होतो, असे साईसंकेत कटके यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com