घणसोलीतील नाल्यात रंगीत रसायनमिश्रित पाणी

घणसोलीतील नाल्यात रंगीत रसायनमिश्रित पाणी
Published on

घणसोलीतील नाल्यात रंगीत रसायनमिश्रित पाणी
दुर्गंधीमुळे रहिवाशांचा जीव कोंडला; डोकेदुखी, मळमळीसह श्वसनाचा त्रास
तुर्भे, ता. २२ (बातमीदार) ः घणसोली परिसरातील नागरी वस्तीला लागून असलेल्या नाल्यात सोमवारी (ता. २२) सकाळी अचानक गडद जांभळ्या रंगाचे रसायनमिश्रित पाणी वाहताना आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या रसायनांमुळे परिसरात उग्र दुर्गंधी पसरली असून, अनेक रहिवाशांना मळमळ, डोकेदुखी तसेच श्वसनासंबंधी त्रास जाणवू लागल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या काळातच हा गंभीर प्रकार समोर आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
घणसोली गावाच्या वेशीपासून सुरू होणारा हा नाला पुढे घणसोली सेक्टरमधून खाडीकडे जातो. या नाल्यालगत मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे. एमआयडीसी परिसरातील विविध उद्योगांमधून निघणारे नाले पुढे शहरातून खाडीकडे जात असल्याने त्यामध्ये रसायनमिश्रित सांडपाणी सोडले जात असल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे. सोमवारी सकाळी नाल्यात गडद जांभळ्या रंगाचे पाणी वाहताना नागरिकांच्या निदर्शनास आले. पाण्याचा रंग आणि दुर्गंधीमुळे परिसरात काही काळ अस्वस्थ वातावरण निर्माण झाले. दूषित पाण्याच्या संपर्कामुळे तसेच त्यातून निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे काही नागरिकांना मळमळ आणि डोकेदुखीचा त्रास जाणवू लागल्याचे स्थानिकांनी सांगितले.

प्रक्रिया न करता सांडपाणी सोडल्याचा दावा
एमआयडीसीतील रासायनिक उद्योगांनी सांडपाण्यावर आवश्यक प्रक्रिया केल्यानंतरच ते बाहेर सोडणे अपेक्षित आहे. मात्र, काही कंपन्यांकडून प्रक्रिया न करताच रसायनमिश्रित पाणी थेट नाल्यात सोडले जात असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. नाल्यातील पाण्याची तपासणी करून त्यातील रासायनिक घटकांचा शोध घ्यावा तसेच संबंधित उद्योगांची तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांची पाहणी करावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी घणसोलीतील रहिवासी स्मिता देशमुख यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com