गॅसचा तुटवडा संपला; तरी खाद्यपदार्थ महागच!

गॅसचा तुटवडा संपला; तरी खाद्यपदार्थ महागच!
Published on

गॅसचा तुटवडा संपला; तरी खाद्यपदार्थ महागच!
भाववाढ कायम राहिल्याने नोकरदार, विद्यार्थी व कामगारांच्या खिशाला कात्री
जुईनगर, ता. २२ (बातमीदार) : व्यावसायिक गॅस सिलिंडरचा मागील महिन्यात निर्माण झालेला तुटवडा आता सुरळीत झाला आहे. तरीही त्याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसतच आहे. नवी मुंबईतील हॉटेल्स, खाणावळी आणि नाश्त्याच्या गाड्यांवर गेल्या महिन्यात वाढविलेले खाद्यपदार्थांचे भाव गॅसपुरवठा पूर्ववत झाल्यानंतरही कमी झालेले नाहीत. खाद्यपदार्थांच्या भावात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाल्याने दररोज बाहेर जेवणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी आणि कामगारांचे बजेट कोलमडले आहे.
नवी मुंबईतील आयटी कंपन्या, औद्योगिक क्षेत्रे, कार्यालये आणि बांधकाम प्रकल्पांमध्ये काम करणारे अनेक कर्मचारी दुपारच्या जेवणासाठी खाणावळी किंवा हॉटेल्सवर अवलंबून असतात. विद्यार्थीदेखील कमी खर्चात जेवण मिळावे म्हणून या पर्यायाचा वापर करतात, मात्र थाळी, नाश्ता आणि इतर खाद्यपदार्थांच्या भावात झालेल्या वाढीमुळे दररोजच्या खर्चात वाढ झाली आहे. काही महिन्यांपूर्वी ७० ते ८० रुपयांना मिळणारी साधी शाकाहारी थाळी आता ९० ते १०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. अतिरिक्त भाजी, भात किंवा इतर पदार्थांसाठी स्वतंत्र शुल्क आकारले जात असल्याने ग्राहकांच्या खर्चात आणखी भर पडत आहे.
शहरात वडापाव व नाश्ता विक्रेत्यांनीही भाववाढ केली असून, पूर्वी १५ रुपयांना मिळणारा वडापाव आता अनेक ठिकाणी २० रुपयांना मिळत आहे. समोसा-पाव, भजी-पाव, मिसळपाव यांसारख्या नाश्त्याच्या पदार्थांच्या भावातही १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे चित्र आहे. यामुळे ‘गॅसचा तुटवडा संपला; महागाईचा तडका मात्र कायम’ अशी स्थिती शहरात निर्माण झाली आहे.

कच्च्या मालाच्या किमतीत वाढ
महागाईने हॉटेल, खाणावळ आणि नाश्त्याच्या पदार्थांच्या उत्पादन खर्चावर होत असल्याचे व्यावसायिक सांगतात. खाद्यतेल, बटाटा, भाजीपाला, गॅस, वीज, भाडे आणि कामगारांचे वेतन यामुळे छोट्या व्यावसायिकांचे आर्थिक गणितही बिघडले आहे. त्यामुळे गॅसचा तुटवडा संपला असला तरी इतर खर्च वाढल्यामुळे भाव पूर्ववत करणे कठीण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडर आणि कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने खाद्यपदार्थांची भाववाढ करणे अपरिहार्य झाले आहे. भाव वाढवल्यामुळे ग्राहक तक्रार करत आहेत, परंतु सर्व बाबींचा विचार करता व्यवसायात तग धरून राहण्यासाठी दुकानदारांना भाववाढीचा निर्णय घ्यावा लागत आहे.
- अक्षय वाघुले, खाद्यपदार्थ व्यावसायिक, नेरूळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com