

चातक, पावशा पक्ष्यांचा नवी मुंबईत मुक्त संचार
बेलापूर, ता. २२ (बातमीदार) ः पावसाळ्याच्या आगमनाची चाहूल देणारे पावशा व चातक हे पक्षी सध्या नवी मुंबईतील विविध पाणथळ क्षेत्रांमध्ये मोठ्या संख्येने दिसून येत आहेत. एनआरआय कॉम्प्लेक्स आणि चाणक्य पाणथळ परिसरात या पक्ष्यांचा मुक्त संचार पाहायला मिळत असून, त्यांच्या विविध हालचाली कॅमेऱ्यात टिपण्यासाठी पक्षीप्रेमींची मोठी गर्दी होत आहे.
पावशा भारतात राजस्थान, काश्मीर आणि ईशान्य भारताचा काही भाग वगळता उर्वरित सगळ्या राज्यांमध्ये पाहायला मिळतो. विणीच्या हंगामात सतत ओरडणारा पावशा हिवाळ्यात मात्र कोकिळेप्रमाणेच गप्प असतो. कोकिळेच्या वर्गातला असल्याने कोकिळेसारखाच पावशादेखील ‘ब्रूड पॅरासाइट’ आहे. अर्थात हा पक्षीदेखील स्वतःचे घरटे न बनवता आपले अंडे दुसऱ्या पक्ष्याच्या घरट्यात घालतो. मार्च ते जून हा पावशाचा विणीचा हंगाम असतो. तर, संस्कृत आणि मराठी साहित्यात चातक पक्षी प्रसिध्द आहे तो ‘फक्त पावसाचं पाणी पिणारा पक्षी’ म्हणून. प्रत्यक्षात असं काही नसतं. चातक हासुद्धा पावशाप्रमाणेच कक्कू कुळातील पक्षी आहे. याच्या तीन उपजाती आहेत. पायका, सिरेट्स आणि याकोबिनस. सिरेट्स ही जात आफ्रिकेतून उत्तर भारतात स्थलांतर करून येते. याकोबिनस ही जात दक्षिण भारतात आढळते. जॅकोबिन कक्कू, पाइड कक्कू किंवा पाइड क्रेस्टेड कक्कू या इंग्रजी नावांनी तो ओळखला जातो. डोक्यावरचा काळा तुरा, पंखांवरचा पांढरा पट्टा आणि पांढऱ्या टोकाची लांब शेपटी यामुळे चातक नजरेत भरतो. विणीच्या हंगामात हे पक्षी एकमेकांचा पाठलाग करत जोरदार गोंगाट करतात. पावसाळ्याशी नातं जुळलेले हे पक्षी निरीक्षकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत.
नवी मुंबईत पोषक वातावरण आणि मुबलक खाद्य
शहरात पावसाळ्यात किटकांची पैदास मोठ्या प्रमाणावर होत असल्याने पक्ष्यांना खायला विपुल अन्न उपलब्ध असते. त्यामुळे खरतर सगळेच पक्षी पावसाच्या आगमानाने सुखावतात, मात्र चातक, पावशा अशा काही पक्ष्यांचे नाव पावसाशी जोडलेलं आहे. एनआरआय, चाणक्य या पाणथळ जागी सध्या हे पक्षी मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. दरम्यान, पावसाळा संपत आला की साधारण ऑक्टोबरपासून हे पक्षी दिसेनासे होतात, असे निरीक्षकांकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.