

बदलापूरच्या जांभळाची दिल्लीत दखल!
प्रत्यक्ष चाचणीसाठी केंद्राकडून वरिष्ठ वैज्ञानिकांची नियुक्ती
बदलापूर, ता. २२ (बातमीदार) ः बदलापूरच्या जांभूळ संशोधन आणि संवर्धनाच्या प्रयत्नांची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. ‘बदलापूर जामुन’ या नावाने जांभूळ वाणाच्या नोंदणीसाठी करण्यात आलेल्या अर्जाच्या अनुषंगाने वनस्पती जाती आणि शेतकरी हक्क संरक्षण प्राधिकरणाने प्रत्यक्ष ठिकाणी चाचणी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अखत्यारीतील या प्राधिकरणाने १७ सप्टेंबरला जारी केलेल्या पत्रानुसार, लखनौ येथील केंद्रीय उपोष्णकटिबंधीय फलोत्पादन संस्थेच्या जांभूळ चाचणी केंद्रातील वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. अंशुमान सिंह यांची या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील पथक बदलापुरात येऊन प्रस्तावित ‘बदलापूर जामुन’ वाणाचा वेगळेपणा, एकसारखेपणा आणि स्थिरता या निकषांवर प्रत्यक्ष तपासणी करणार आहे. त्यानंतर या वाणाची चाचणी केंद्रात जतन केलेल्या संदर्भ वाणाशी तुलना करण्यात येणार आहे. त्यामुळे बदलापूरच्या मातीत विकसित झालेल्या जांभूळ वाणाला शास्त्रीय आणि अधिकृत मान्यता मिळविण्याच्या प्रक्रियेला महत्त्वपूर्ण टप्पा गाठता आला आहे.
बदलापूरच्या जांभूळ संशोधन केंद्राचा विस्तार केवळ संशोधनापुरता मर्यादित न ठेवता त्यातून कृषी उद्योजकता, बीज बँक, रोपवाटिका व्यवस्थापन, अन्नप्रक्रिया इत्यादी क्षेत्रांमध्ये रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जांभळाच्या विविध जातींचे संवर्धन, लागवड, रोपांची निर्मिती, प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे उत्पादन आणि त्यांची बाजारपेठ विकसित झाल्यास स्थानिक शेतकरी तसेच तरुणांना आर्थिकदृष्ट्या नवी दिशा मिळू शकते. केंद्र सरकारकडून या उपक्रमाची दखल घेऊन वरिष्ठ वैज्ञानिकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष चाचणीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने या प्रयत्नांना मोठे बळ मिळाले आहे.
-----------------------
‘‘दिल्लीतून केंद्र सरकारने उपक्रमाची दखल घेतली आणि वरिष्ठ वैज्ञानिकांच्या माध्यमातून चाचणीची प्रक्रिया सुरू केली, ही अभिमानाची बाब आहे. भविष्यात जांभूळ संशोधनासोबत कृषी उद्योजकता, बीज बँक, रोपवाटिका व्यवस्थापन आणि अन्नप्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.’’
- आदित्य अरविंद गोळे, मुख्य विश्वस्त
जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास चॅरिटेबल ट्रस्ट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.