

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रात्रशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी या शाळांना पूर्णवेळ शाळांचा दर्जा देणे आवश्यक आहे. यासाठी अनेक अहवाल आणि धोरणातूनही हा दर्जा देण्याच्या शिफारशी करण्यात आल्या असताना तो दर्जा कधी जाणार, असा सवाल रात्रशाळा संघटनेने केला असून, यासाठी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे या दर्जासंदर्भातील निवदेन सादर केले आहे.
महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी कष्टकरी, वंचित आणि शिक्षणापासून दूर राहणाऱ्या घटकांसाठी रात्रशाळांची संकल्पना पुढे आणली. या संकल्पनेचा विस्तार होऊन सध्या महाराष्ट्रात १६५ माध्यमिक व उच्च माध्यमिक रात्रशाळा कार्यरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दिवसा रोजगार किंवा व्यवसाय करून रात्री शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना या शाळांचा लाभ होत आहे.
रात्रशाळांमध्ये दिवसाच्या शाळांच्या तुलनेत कमी अध्यापन तास होत असल्याने विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या पातळीवर अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. परिणामी इच्छुक विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विज्ञान, वाणिज्य तसेच अन्य उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात प्रवेश घेताना अडथळे येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
मुंबईतील शाळांना हवा दिलासा
मुंबईतील १२९ रात्रशाळा कार्यरत होत्या; परंतु त्यांना योग्य सोयीसुविधा उपलब्ध होऊ शकल्या नसल्याने अनेक शाळा संकटात सापडल्या, तर काही बंदही झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या इमारतीत भरत असलेल्या रात्रशाळांचे इमारत भाडे माफ करावे, तर संस्थांच्या इमारतीत भरणाऱ्या रात्रशाळांचे वीजबिल माफ करावे किंवा सौरऊर्जा सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवड श्रेणीचे लाभ मिळावेत
२००५ पूर्वी सेवेत आलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना, त्यानंतर सेवेत आलेल्यांना प्रचलित पेन्शन योजना लागू करणे, वेतनेतर अनुदान दुप्पट करणे, प्रत्येक रात्रशाळेत मुख्याध्यापक पद निर्माण करणे, शिक्षकांच्या अर्धवेळ सेवेची पूर्णवेळ सेवेत गणना करून वरिष्ठ व निवड श्रेणीचे लाभ देणे, रिक्त शिक्षक व शिक्षकेतर पदे तातडीने भरण्यास मंजुरी देणे तसेच विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार योजनेत बदल करून बंद पाकिटातील भोजन देणे अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.
रात्रशाळांना नवसंजीवनी द्यावी
महात्मा फुले यांच्या रात्रशाळा संकल्पनेला त्यांच्या द्विजन्मशताब्दी जयंती वर्षात न्याय देऊन रात्रशाळांना नवसंजीवनी द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. निवेदनावर रात्रशाळा संघटनेचे सरचिटणीस सुनील सुसरे, अध्यक्ष अविनाश ताकवले आणि खजिनदार गजेंद्र गाडगीळ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.