घटस्थापनेसाठीच्या साहित्याने नवी मुंबईतील बाजारपेठा सजल्या

घटस्थापनेसाठीच्या साहित्याने नवी मुंबईतील बाजारपेठा सजल्या
Published on: 

घटस्थापनेच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या
पूजा साहित्यासह आकर्षक कलश, रंगीबेरंगी साड्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी
नेरूळ, ता. २ (बातमीदार) ः शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असल्याने नवी मुंबईतील बाजारपेठा घटस्थापनेच्या विविध पूजा साहित्याने सजल्या आहेत. यंदा ११ ऑक्टोबरला घटस्थापना होणार असून, नागरिकांनी आतापासूनच पूजेच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी करण्यास सुरुवात केली आहे.
घटस्थापनेसाठी मातीचे भांडे, मिक्स धान्य, कलश, नारळ, आंब्याची पाने, सुपारी, फुले, हळद-कुंकू, मौली इत्यादी साहित्य आवश्यक असते. यंदा बाजारात घटस्थापनेसाठी आवश्यक मातीचे आकर्षक, विविध रंगांचे व नक्षीदार घट उपलब्ध आहेत. पारंपरिक तांब्या-पितळेच्या कलशांसोबतच लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी, केशरी अशा विविध रंगांतील घट उपलब्ध आहेत. त्यावर आकर्षक नक्षीकाम, कुंदन, मिरर वर्क, मोती आणि रंगीत सजावट करण्यात आली आहे.
नवी मुंबईतील नेरूळ, वाशी, सानपाडा, तुर्भे, सीबीडी-बेलापूर इत्यादी भागांतील बाजारपेठांमध्ये नवरात्रीच्या पूजा साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. यंदा पूजा साहित्याबरोबरच घटाभोवती सजावट करण्यासाठी रांगोळी, फुलांच्या माळा, तोरणे, देवीची चुनरी, लाल पिवळे वस्त्र, सजावटीची पाने, कृत्रिम फुले आणि दिव्यांच्या माळांनाही मागणी आहे. याशिवाय देवीसाठी विविध प्रकारच्या साड्या, दागिने, मुकुट आणि पूजेच्या थाळ्याही बाजारात दाखल झाल्या आहेत.

घटस्थापना साहित्याचे अंदाजित दर
मातीचे घट ५० ते ८०
तांब्याचा/रंगीत घट ३०० ते ५००
मिक्स धान्य पुडी २० ते ५०
पूजेसाठी माती २० ते ५०
नारळ ३० ते ६०
विड्याची पाने ५ ते २०
सुपारी ५ ते १५
मौली/कलावा १० ते ३०
हळद-कुंकू २० ते ५०
फुलांची माळ ३० ते १५०
झेंडूची फुले ४० ते१५०
देवीची लाल चुनरी ५० ते २००
पूजेचे साहित्य संच १०० ते ४००
अगरबत्ती २० ते ४०
कापूर २० ते ८०

महिलांसाठी रंगीबेरंगी साड्यांचीही खरेदी
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांमध्ये विविध रंगांच्या साड्यांची खरेदी करण्यासाठी लगबग दिसून येत आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी वेगवेगळ्या रंगांच्या, नक्षीदार साड्या, पैठणी, कॉटन तसेच आकर्षक प्रिंटच्या साड्यांना मागणी वाढली आहे. यासोबतच साडीला साजेसे ब्लाऊज, दागिने, बांगड्या आणि इतर अॅक्सेसरीजचीही खरेदी केली जात आहे.
यंदा बाजारात लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी, निळा, जांभळा, केशरी आणि पांढरा अशा विविध रंगांच्या साड्यांचे आकर्षक पर्याय उपलब्ध आहेत. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी वेगळ्या रंगाची साडी परिधान करण्यासाठी महिला आवर्जून खरेदी करीत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे पूजा साहित्याबरोबरच साड्यांच्या दुकानांमध्येही ग्राहकांची गर्दी वाढताना दिसत आहे.

नवरात्रीला घटस्थापनेसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी सुरू झाली आहे. यंदा पारंपरिक मातीच्या घटांसोबत रंगीत व नक्षीदार कलशांना ग्राहकांकडून विशेष पसंती मिळत आहे. देवीच्या सजावटीसाठी फुलांच्या माळा, चुनरी, तोरणे आणि तयार पूजासंचालाही मागणी आहे. नवरात्र जवळ येताच खरेदी आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.
- नरेश कोकाटे, स्थानिक विक्रेता, नेरूळ

दरवर्षीप्रमाणे घरी विधिवत घटस्थापना करण्याची तयारी केली आहे. बाजारात यंदा रंगीत आणि नक्षीदार कलश, फुलांची सजावट तसेच तयार पूजा साहित्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे घटस्थापनेसाठी आवश्यक सर्व साहित्य एकाच ठिकाणी घेणे सोपे झाले आहे.
- शीला शिंदे, स्थानिक महिला ग्राहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com