जुईनगर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात सुविधांचा अभाव

जुईनगर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात सुविधांचा अभाव
Published on: 

पशुवैद्यकीय रुग्णालयात सुविधांचा अभाव
दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेले रुग्णालय नावापुरतेच
नेरूळ, ता. २ (बातमीदार) ः पालिका क्षेत्रातील प्राण्यांच्या उपचारासाठी जुईनगर सेक्टर २४ (स्मशानभूमीलगत) येथे तब्बल पाच कोटींपेक्षा अधिक रुपये खर्चून टोलेजंग पशुवैद्यकीय रुग्णालय उभारले आहे, मात्र अत्याधुनिक सुविधा, पुरेसे मनुष्यबळ आणि ॲम्बुलन्सच्या अभावामुळे हे रुग्णालय केवळ नावापुरतेच सुरू असल्याची खंत लोकप्रतिनिधी व प्राणीप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
पालिका क्षेत्राचा विस्तार मोठा असताना संपूर्ण शहरासाठी केवळ जुईनगर सेक्टर २५ येथे एकच पशुवैद्यकीय दवाखाना उपलब्ध आहे. याची इमारत तयार होऊन तब्बल दोन वर्षे उलटून गेली तरीही पालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा दवाखाना बंद अवस्थेत पडून होता. नगरसेवक पदांची निवड झाल्यानंतर केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे गेल्या सात महिन्यांपूर्वी हा दवाखाना सुरू करून घेण्यात यश आले, परंतु या दवाखान्यात अनेक सुविधांची वानवा असल्याचे दिसून येते. दवाखान्यात एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, सोनोग्राफी यांसारख्या कोणतीही अत्याधुनिक तपासणी व निदानाच्या सुविधा उपलब्ध नाहीत. शस्त्रक्रिया किंवा गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आवश्यक साधनांचा तुटवडा असल्याने नागरिकांना आपल्या पाळीव व भटक्या प्राण्यांच्या उपचारासाठी खाजगी दवाखान्यांचे महागडे उंबरठे झिजवावे लागत आहेत. त्यातच सफाई कर्मचाऱ्यांचा अभाव असल्यामुळे येथे स्वच्छतेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

२४ तास चालू ठेवण्याची मागणी
​१ सध्या हा दवाखाना केवळ सकाळी ९ ते ५ या सत्रात चालवला जात असल्याने, रात्रीच्या वेळी किंवा आपत्कालीन परिस्थितीत प्राण्यांवर उपचार करण्यासाठी कोणतीही व्यवस्था येथे उपलब्ध नाही. प्राण्यांच्या आपत्कालीन वैद्यकीय गरजा लक्षात घेता हा दवाखाना २४ तास चालवणे गरजेचे आहे.
२ याशिवाय परिसरातील एखाद्या प्राण्याला अपघात होऊन गंभीर दुखापत झाल्यास त्याला तातडीने दवाखान्यात नेण्यासाठी स्वतंत्र ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे जुईनगर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आवश्यक वैद्यकीय सुविधा वाढविण्यासोबतच जखमी प्राण्यांसाठी स्वतंत्र ॲम्बुलन्स उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

या सर्व गंभीर आणि तातडीच्या विषयांवर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली आहे, तसेच पालिका प्रशासनाला वेळोवेळी लेखी पत्रेही दिली आहेत, मात्र आरोग्य विभागाकडून अद्याप कोणतीही सकारात्मक पावले उचलली गेलेली नाहीत. प्रशासनाने या समस्या त्वरित सोडवल्या नाहीत तर पालिकेच्या आगामी महासभेत सभागृहामध्ये हा विषय मी आक्रमकपणे मांडणार आहे.
- अभिजित देसाई, नगरसेवक

जुईनगर सेक्टर २४ येथे पशुवैद्यकीय दवाखाना उभारला आहे. इमारतीसाठी जवळजवळ पाच कोटींपेक्षा अधिकचा खर्च करण्यात आला. येथे सर्व सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. महापालिकेने लवकरात लवकर साधने उपलब्ध करून द्यावीत.
- विशाल ससाणे, नगरसेवक, ठाकरे गट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com