भक्तीला निसर्गसंवर्धनाची जोड

भक्तीला निसर्गसंवर्धनाची जोड
Published on: 

उल्हासनगर, ता. २ (वार्ताहर) : बाप्पाचा आवडता मोदक आता प्रसादापुरता मर्यादित न राहता धरतीच्या कुशीत हिरवाई रुजवणार आहे. एसएसटी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सच्या एनएसएस स्वयंसेवकांनी बियांनी युक्त ‘बीज मोदक’ नागरिकांच्या हाती देत ‘आज मोदक पेरा, उद्या झाड फुलवा’ असा अभिनव संदेश दिला. भक्ती, सामाजिक जाणीव आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम या उपक्रमातून साधण्यात आला.
गणेशोत्सवाच्या भक्तीमय वातावरणात पर्यावरण संवर्धनाचा जागर करण्यासाठी एसएसटी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) युनिटतर्फे ‘बीज मोदक’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. एनएसएसच्या स्वयंसेवकांनी शहरातील विविध शाळा, शासकीय कार्यालये, बँका आणि सार्वजनिक ठिकाणी सीड मोदकांचे वाटप करत वृक्षारोपणाचा संदेश दिला. विविध वनस्पतींच्या बियांचा समावेश असलेल्या या मोदकांचा योग्य पद्धतीने मातीत वापर केल्यास त्यातून रोपे उगवू शकतात. त्यामुळे गणेशोत्सवातील पारंपरिक मोदकाला पर्यावरणपूरक संकल्पनेची अनोखी जोड मिळाली. स्वयंसेवकांनी शाळांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधत वृक्षारोपण, जैवविविधता, वाढते प्रदूषण आणि पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. शासकीय कार्यालये आणि बँकांमध्येही सीड मोदकांचे वितरण करून नागरिकांना निसर्ग संवर्धनासाठी प्रत्यक्ष कृती करण्याचे आवाहन करण्यात आले.
गणेशोत्सवातून धार्मिक श्रद्धेबरोबरच सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. विद्यार्थी, शिक्षक, नागरिक आणि विविध संस्थांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘बाप्पाचा मोदक मातीत पेरा अन् हिरवाईच्या रूपाने निसर्गाचा प्रसाद मिळवा’, असा आगळावेगळा संदेश एसएसटीच्या या उपक्रमातून शहरभर पोहोचला.

क्यूआर कोड
एसएसटी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मातीपासून आकर्षक मोदक तयार करून त्यामध्ये विविध झाडांच्या बियांचा समावेश केला. विशेष म्हणजे, प्रत्येक मोदकाच्या पॅकिंगवर दिलेला क्यूआर कोड स्कॅन केल्यावर त्या मोदकामध्ये कोणत्या झाडाचे बीज आहे, याची माहिती मिळणार आहे.

=================================

उल्हासनगर : बीज मोदकचा प्रसाद महापौर अश्विनी निकम यांना देताना एसएसटी महाविद्यालयाचे विद्यार्थी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com