

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारींमागे अनेकदा कौटुंबिक दुर्लक्ष, मानसिक छळ, आर्थिक शोषण किंवा सामाजिक एकटेपणाची कारणे दडलेली असतात. त्यामुळे केवळ आजारावर उपचार न करता ज्येष्ठांच्या सामाजिक आणि मानसिक स्थितीचीही तपासणी करण्याची गरज आहे. जे. जे. रुग्णालयातील प्रादेशिक जेरियाट्रिक केंद्रात अशा समस्यांची दखल घेत उपचारासोबत समुपदेशन, सामाजिक कार्यकर्त्यांची मदत आणि गरज भासल्यास कायदेशीर हस्तक्षेपही केला जात आहे.
या विभागात दर महिन्याला सुमारे २०० ते २५० ज्येष्ठ नागरिकांची तपासणी होते. वाढत्या वयामुळे उद्भवणाऱ्या शारीरिक आजारांसोबत स्मरणशक्ती कमी होणे, पडण्याचा धोका, लघवीवरील नियंत्रण सुटणे, नैराश्य, कुटुंबीयांकडून दुर्लक्ष अशा विविध समस्यांचे मूल्यांकन केले जाते. विभागात सहा खाटांची सुविधा असून, दीर्घकालीन उपचार घेणाऱ्या ज्येष्ठांचीही काळजी घेतली जाते.
मालमत्ता मुलांना दिली; मात्र आधार हरवला
दक्षिण मुंबईतील ७० वर्षांच्या एका महिलेने पतीच्या निधनानंतर आपली मालमत्ता मुलांच्या नावावर केली, मात्र त्यानंतरच्या काही वर्षांत मुलांकडून आणि सुनेकडून दुर्लक्ष होत होते. कुटुंबात आपल्याला डावलले जात असल्याने त्या मानसिकदृष्ट्या खचल्या आणि जे. जे. रुग्णालयात दाखल झाल्या. जेरियाट्रिक विभागात त्यांच्या आरोग्यासोबत मानसिक स्थितीचे मूल्यांकन आणि समुपदेशन सुरू असताना कौटुंबिक परिस्थिती समोर आली. त्यानंतर डॉक्टर, सोशल वर्कर यांनी ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइन १४५६७, पोलिस आणि संबंधित यंत्रणांची मदत घेतली. कायदेशीर प्रक्रियेनंतर संबंधित महिलेची मालमत्ता पुन्हा त्यांच्या नावावर करण्यात आली.
आर्थिक शोषणाचीही दखल
ज्येष्ठांवरील दुर्लक्ष केवळ उपचार न मिळण्यापुरते मर्यादित नसते. आर्थिक साधनांवर जबरदस्तीने ताबा मिळवणे, निवृत्तिवेतनाचा गैरवापर करणे, वेळेवर अन्न किंवा औषधे न देणे, मानसिक अथवा शारीरिक त्रास देणे अशा प्रकारांचाही विभागाकडून विचार केला जातो. आर्थिक अडचण असलेल्या रुग्णांना औषधांसाठी सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मदत केली जाते.
२०१२ पासून स्वतंत्र केंद्र
जे. जे. रुग्णालयातील प्रादेशिक जेरियाट्रिक केंद्राची सुरुवात २०१२ मध्ये झाली. देशातील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आठ प्रादेशिक जेरियाट्रिक केंद्रांपैकी मुंबईतील हे केंद्र असून, महाराष्ट्रातील पहिले केंद्र असल्याची आहे. येथे ६० वर्षांवरील नागरिकांवर उपचार केले जातात. मेमरी क्लिनिकमध्ये स्मरणशक्ती कमी होणे आणि डिमेंशियाची संभाव्य लक्षणे तपासली जातात. फॉल रिस्क असेसमेंटमध्ये दृष्टी, श्रवणक्षमता आणि चालताना तोल जाण्याची शक्यता तपासली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.