

निधीअभावी औषधांचा तुटवडा
पनवेल उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना बाहेरून औषधे घेण्याची वेळ
नवीन पनवेल, ता. २ (बातमीदार) : पनवेल येथील महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात औषधसाठ्याची कमतरता निर्माण झाली आहे. निधीअभावी औषधांची स्थानिक पातळीवर पुरेशी खरेदी करणे शक्य होत नसल्याने रुग्णांना काही औषधे बाहेरून आणण्याचा सल्ला दिला जात असल्याचे समोर आले आहे. या रुग्णालयात मोठ्या संख्येने गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येत असल्याने त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.
रुग्णालयात सर्दी, खोकला, तापावरील प्राथमिक औषधांपासून प्रतिजैविके आणि इतर महत्त्वाच्या औषधांचा तुटवडा जाणवत आहे. पॅरासिटामल, मधुमेहावरील औषधे, प्रतिजैविके, केमोथेरपीसाठी लागणारी औषधे, रेबीजची लस, शिरेवाटे देण्यात येणारे द्रवपदार्थ तसेच जखमांवर पट्टी करण्यासाठी लागणारा कापूस यांसारख्या वस्तूंचीही कमतरता असल्याचे सांगण्यात आले.
रुग्णालयात सीटी स्कॅन, डायलिसिस यांसह विविध सुविधा उपलब्ध आहेत. तसेच १७ व्हेंटिलेटर उपलब्ध असून गंभीर रुग्णांवर उपचार केले जातात, मात्र उपचारासाठी आवश्यक औषधे उपलब्ध नसल्यास या सुविधांचा उपयोग करताना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गंभीर रुग्णांना आवश्यक औषधे बाहेरून घ्यावी लागल्यास त्यांचा खर्च वाढत आहे.
केंद्र स्तरावरून औषधांचा पुरवठा वेळेत न झाल्याने रुग्णालय प्रशासनाला स्थानिक पातळीवर औषधे खरेदी करावी लागत आहेत, मात्र त्यासाठी उपलब्ध असलेला निधी मर्यादित असल्याने मागणीनुसार औषधसाठा उपलब्ध करून देण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे शासनाकडून औषधांच्या पुरवठ्यासाठी पुरेसा निधी आणि नियमित व्यवस्था उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त होत आहे.
केंद्रीय खरेदी प्रणालीतील विलंबाचा परिणाम
राज्यातील सरकारी रुग्णालयांसाठी औषध खरेदी व पुरवठ्याची केंद्रीय व्यवस्था आहे. या व्यवस्थेत तांत्रिक आणि प्रशासकीय विलंब झाल्याने औषधांचा नियमित पुरवठा प्रभावित झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. केंद्रीय साठा कमी होत असताना स्थानिक पातळीवर तातडीने खरेदी करून गरज भागवण्याचा प्रयत्न केला जात आहे, मात्र मर्यादित निधीमुळे सर्व औषधे उपलब्ध करून देणे शक्य होत नसल्याने रुग्णांना बाहेरून औषधे घ्यावी लागत आहेत. त्यामुळे औषधांचा नियमित पुरवठा पूर्ववत करण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
कोट
हा तुटवडा केवळ स्थानिक पातळीवर नसून राज्यभरातील सरकारी रुग्णालयांमध्ये औषध खरेदीच्या केंद्रीय प्रणालीत झालेल्या तांत्रिक व प्रशासकीय विलंबाचा परिणाम आहे. त्यामुळे निधीअभावी रुग्णांना औषधे पुरविणे अवघड झाले आहे.
- डॉ. शिवाजी पाटील, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, पनवेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.