‘ग्यानू, इट्स डन ब्रो!’

‘ग्यानू, इट्स डन ब्रो!’
Published on: 

नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : ‘व्होट चुराया मेरा, किसने ओ सनम? ग्यानू ने!’... ‘ग्यानेश, इट्स डन ब्रो!’... अशा फिल्मी संवादांच्या धर्तीवर तयार केलेली फलके, मिश्कील व्यंगचित्रे, सेल्फी आणि रील्स. शिवाजी पार्कवर शुक्रवारी (ता. २) झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजीपी) आंदोलनात पारंपरिक राजकीय आंदोलनापेक्षा ‘जेन-झी’च्या शैलीचा ठसा अधिक जाणवला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी शिवाजी पार्कला झालेल्या आंदोलनाची आठवण शुक्रवारच्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा झाली.

‘ईसीआय ज्ञानेशकुमार मस्ट रिजाइन’, ‘नो मोअर व्होट चोरी’, ‘गद्दार ग्यानू मस्ट गो’ आणि ‘रिमूव्ह बीजेपी आरएसएस, सेव्ह इंडिया’ अशा संदेशांची फलके आंदोलकांच्या हातात होती, मात्र आंदोलनस्थळी सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते फिल्मी अंदाजातील आणि मिश्कील संदेशांनी. अनेक तरुण फलके हातात घेऊन उभे राहण्याबरोबरच त्यांचे मोबाईलवर चित्रीकरण करत होते.

‘डॉन’पासून सलमानच्या शैलीपर्यंत
शाहरुख खानच्या ‘डॉन’च्या शैलीत एका फलकावर ‘व्होट चुराया मेरा, किसने ओ सनम? ग्यानू ने’ असा मजकूर लिहिला होता, तर दुसऱ्या फलकावर सलमान खानच्या शैलीत ‘ग्यानेश, इट्स डन ब्रो!’ असा संदेश होता. ‘फ्रॉड की जीए आणि फ्रॉड डिटर्जेंटने धोली जीए’ अशा विनोदी फलकांनीही उपस्थितांचे लक्ष वेधले. आंदोलनातील हे संदेश छायाचित्रे आणि व्हिडिओच्या माध्यमातून समाजमाध्यमांवर पोहोचवण्याची धडपडही सुरू होती.

व्यंगचित्रातून ‘व्होट चोर’
ज्ञानेशकुमार यांना तुरुंगात दाखवणारे ‘कमिंग सून! व्होट चोर’ असे व्यंगचित्रही आंदोलकांनी हातात घेतले होते. थेट घोषणांसोबतच व्यंगचित्रे आणि उपहासात्मक संदेशांचा वापर करून मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे आंदोलनस्थळी असलेल्या विविध फलके ही सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. अनेक जण फलकाचे फोटो मोबाईलमध्ये टिपत होते.

सेल्फी ते रील्सपर्यंत
आंदोलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो घेऊन सेल्फी काढणारे युवकही दिसले. काही कार्यकर्त्यांनी सॅचेट्सची माळ घातली होती, तर वैद्यकीय किट्ससमोर व्यंगचित्रे दाखवणारे तरुणही लक्ष वेधून घेत होते. एका तरुणीने ‘रिक्लेम द, रिबिल्ड द’ असा फलक तयार केला होता. आंदोलनातील घोषणा, फलके आणि विविध दृश्ये मोबाईल कॅमेऱ्यात टिपून त्याचे रिल्स तयार करण्याचा उत्साह अनेक तरुणांमध्ये दिसत होता.

घोषणांनाही सोशल मीडिया टच
‘नो मोअर व्होट चोरी’ ही घोषणा आंदोलनात वारंवार दिली जात होती. पारंपरिक घोषणांबरोबरच इंग्रजी, हिंदी आणि समाजमाध्यमांवरील भाषेतील शब्दांचा वापर तरुणांच्या घोषणांमध्ये दिसला. काही फलकांवरील संदेश इतके छोटे आणि थेट होते की ते छायाचित्रे आणि व्हिडिओमध्ये सहज उठून दिसत होते.

आंदोलनाचे डिजिटल रूप
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. प्रत्यक्ष आंदोलनासोबतच त्याची डिजिटल उपस्थिती निर्माण करण्यावरही भर दिसला. फलके, व्यंगचित्रे, घोषणा आणि सेल्फी यांचे चित्रीकरण करून ते समाजमाध्यमांवर प्रसारित केले जात होते. त्यामुळे शिवाजी पार्कवरील आंदोलनात पारंपरिक राजकीय आंदोलनाची दृश्ये आणि ‘जेन झी’च्या डिजिटल संस्कृतीचा.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी राजीनामा द्यावा, ही आमची प्रमुख मागणी आहे. पोस्टर आणि घोषणांच्या माध्यमातून हा मुद्दा तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.
- युवराज पाझंडे, विद्यार्थी, पुणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून नागरिकांना मतदानाचा अधिकार दिला. त्या अधिकाराचा वापर करताना निवडणूक प्रक्रियेवर विश्वास असणे महत्त्वाचे आहे. प्रक्रियेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने झानेशकुमार यांनी राजीनामा द्यावा.
- शुभम कुमार, विद्यार्थी, बनारस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com