

नवी मुंबईत डायलिसिस रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ
ऐरोली व नेरूळ रुग्णालयांत वर्षाभरात तब्बल २४ हजार सत्रे पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २ : पालिका कार्यक्षेत्रात मूत्रपिंडाच्या (किडनी) विकारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे समोर आले आहे. पालिकेच्या ऐरोली आणि नेरूळ येथील सार्वजनिक रुग्णालयांमध्ये १ ऑगस्ट २०२४ ते ३१ जुलै २०२५ या एका वर्षाच्या कालावधीत एकूण २३ हजार ९९५ डायलिसिस सत्रे यशस्वीरीत्या पार पडली आहेत. शहरात दरवर्षी डायलिसिस रुग्णांच्या संख्येत सरासरी १० ते १५ टक्क्यांची वाढ नोंदवली जात असून, सार्वजनिक आरोग्यसेवेवरील ताण वाढत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कंत्राटी तत्त्वावर ही डायलिसिस सुविधा पुरवली जाते. पालिकेकडून निश्चित केलेल्या दरपत्रकानुसार, नियमित डायलिसिस उपचारासाठी प्रति सत्र १,५०७ रुपये दर मंजूर आहे, तर एचआयव्ही व हेपेटायटिस बाधित रुग्णांच्या विशेष उपचारासाठी प्रति सत्र १,७६२ रुपये दर निश्चित केला आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे प्रत्यक्ष उपचाराचा एकूण वार्षिक खर्च मंजूर केलेल्या आर्थिक तरतुदीपेक्षा वाढला आहे. बदलती जीवनशैली, असंतुलित आहार, अनियंत्रित मधुमेह (डायबेटीस) आणि उच्च रक्तदाब (बीपी) ही किडनी विकारांची प्रमुख कारणे मानली जातात. त्यामुळे नागरिकांनी वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घेणे, रक्तातील साखरेचे व दाबाचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे आणि प्राथमिक स्तरावरच आजाराचे निदान करून वैद्यकीय उपचार घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
दोन नवीन डायलिसिस सेंटर्स सुरू
डायलिसिस रुग्णांची वाढती संख्या आणि सध्याच्या रुग्णालयांवर पडणारा ताण लक्षात घेता, पालिकेच्या आरोग्य विभागाने जानेवारीपासून शहरात दोन नवीन डायलिसिस सेंटर्सची उभारणी केली आहे. या नवीन केंद्रांमुळे स्थानिक स्तरावरच रुग्णांना उपचारांची सोय उपलब्ध झाली असून, ऐरोली व नेरूळ रुग्णालयांवरील वाढता भार हलका होण्यास मदत होत आहे.
मंजूर उद्दिष्टापेक्षा प्रत्यक्ष उपचारात २८ टक्के वाढ
महापालिकेने कंत्राट देताना ऐरोली आणि नेरूळ या दोन्ही रुग्णालयांत मिळून वर्षाला एकूण १८ हजार ७२० डायलिसिस सत्रांची (सत्रांची संख्या स्थिर धरून) प्राथमिक वर्गवारी केली होती, मात्र रुग्णांची वाढती गर्दी पाहता ऑगस्ट २०२४ ते जुलै २०२५ प्रत्यक्षात २३,९९५ डायलिसिस सत्रे पार पडली आहेत. म्हणजेच मंजूर क्षमतेपेक्षा तब्बल ५,२७५ अधिक उपचारांची सत्रे पार पडली आहेत.
ऐरोली व नेरूळ रुग्णालयांची तुलनात्मक आकडेवारी
नेरूळ सार्वजनिक रुग्णालय : येथे एकूण १३,०४५ डायलिसिस सत्रे पार पडली असून, ही सर्व सत्रे नियमित डायलिसिस श्रेणीतील होती.
ऐरोली सार्वजनिक रुग्णालय : येथे एकूण १०,९५० डायलिसिस सत्रे पार पडली. यामध्ये ९,२२० नियमित आणि १,७३० एचआयव्ही व हेपेटायटिस बाधित रुग्णांच्या विशेष सत्रांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.