डॉक्टर नसल्याने पुरुष विभाग बंद

डॉक्टर नसल्याने पुरुष विभाग बंद
Published on: 

डॉक्टर नसल्याने पुरुष विभाग बंद
नेरूळच्या मीनाताई ठाकरे रुग्णालयातील प्रकार; रुग्णांना वाशीला जाण्याचा सल्ला
तुर्भे, ता. २ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कोट्यवधी खर्च केले जात असताना मनुष्यबळाअभावी रुग्णसेवा प्रभावित होत असल्याचे चित्र आहे. नेरूळ येथील मीनाताई ठाकरे रुग्णालयातील पुरुष विभाग २० सप्टेंबरपासून बंद ठेवला आहे. फिजिशियन उपलब्ध नसल्याने हा विभाग बंद केल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून दिली आहे.
मीनाताई ठाकरे रुग्णालय हे नेरूळ, पूर्व-पश्चिम, बेलापूर तसेच परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचे महापालिका रुग्णालय आहे, मात्र पुरुष विभाग बंद असल्याने उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यामुळे रुग्णांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाढत असून, काही रुग्णांना खासगी रुग्णालयांचा पर्याय स्वीकारावा लागत असल्याचे चित्र आहे.
पुरुष रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यानंतर त्यांना वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात पाठविले जात आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची गैरसोय होत आहे.

डॉक्टर मिळाल्यानंतर पुन्हा सुरु होईल
आरोग्य समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ यांनीही या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाकडून याबाबत माहिती घेतली. रुग्णालयातील माहिती अधिकारी डॉ. भारती भालेराव यांच्याशी संपर्क साधला असता फिजिशियन उपलब्ध नसल्याने पुरुष विभाग बंद ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. याबाबत महापालिका आयुक्त आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी यांनाही माहिती देण्यात आली असून, डॉक्टर उपलब्ध झाल्यानंतर पुरुष विभाग पुन्हा सुरू करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com