मुंबई विमानतळाभोवती अनधिकृत मांसविक्रीला रोखा!

मुंबई विमानतळाभोवती अनधिकृत मांसविक्रीला रोखा!
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दहा किमी परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत मांस व मासेविक्रीच्या दुकानांमुळे पक्षी विमानांना धडकण्याचा धोका निर्माण होतो, या बाबींची उच्च न्यायालयाने पुुन्हा एकदा गंभीर दखल घेतली आहे. परिसरातील  दुकाने कायमस्वरूपी बंद राहतील, यासाठी सर्वसमावेशक कृती आराखडा सादर करण्याचे आदेश न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने केलेल्या अंतरिम अर्जावर न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठासमोर नुकतीच सुनावणी झाली. विमानतळ परिसरातील अनधिकृत कत्तलखाने व मांसविक्रीमुळे पक्षी आकर्षित होऊन विमान सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याचे कंपनीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यासंदर्भातील न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशांची मागील दशकभरात पुरेशी अंमलबजावणी झालेली नसल्याचा दावाही त्यांनी केला.

त्यावर, जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत १३ विभागांमध्ये केलेल्या कारवाईचा अहवाल महापालिकेने सादर केला. त्यानुसार, ३२३ अनधिकृत मांसविक्रीच्या दुकानांवर कारवाई करण्यात आली. मात्र, कारवाईच्या दिवशी दुकाने बंद ठेवून अन्य दिवशी पुन्हा व्यवसाय सुरू ठेवण्यात येत असल्याची माहिती महापालिकेनेच प्रतिज्ञापत्राद्वारे दिली. जनावरे व माल जप्त करूनही ही दुकाने नियमित सुरू असल्याने अनधिकृत कोंबडीविक्री सुरूच असल्याचे महापालिकेने मान्य केले.

अडथळे असल्यास पोलिसांची मदत घ्या
पालिकेच्या या खुलासावर नाराजी व्यक्त करत, दुकाने पूर्णपणे अनधिकृत असतील तर रस्त्यावरील अतिक्रमणे पाडता किंवा हटवता येणार नाहीत का, असा प्रश्नही  न्यायालयाने महापालिकेला केला. कुर्ल्यासह विमानतळालगतच्या दाट वस्त्यांमध्ये कारवाई करताना अधिकाऱ्यांना अडथळे येत असल्यास त्यांच्या सुरक्षेसाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी बंदोबस्त देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com