

‘जंतरमंतर २’ लवकरच!
ज्ञानेशकुमारांच्या राजीनाम्यासाठी ‘सीजेपी’चा इशारा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : ‘नागरिकांच्या अधिकारांसाठी लढणे हीच गांधीजींना खरी श्रद्धांजली आहे. गांधी विचारांना संपवण्याचा प्रयत्न झाला, तरी गांधींचा विचार कधीही संपणार नाही. गांधी हे देशाच्या आत्म्याचे प्रतीक आहेत. युवकांच्या माध्यमातून त्यांचे विचार जिवंत राहतील. नथुराम गोडसेसारखे हजारो आले तरी गांधीजींचा विचार संपणार नाही,’ असे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी असा टाेला लागावतानाच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांचा राजीनामा न घेतल्यास ‘लवकरच जंतरमंतर २’ पाहायला मिळेल, असा निर्वाणीचा इशारा केंद्र सरकारला दिला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आज (ता. १) शिवाजी पार्क येथे ज्ञानेशकुमार यांच्याविरुद्ध जाेरदार आंदाेलन केले. या वेळी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका करतानाच दीपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्यावर निशाणा साधला. भारतातील लोकशाहीसमोर प्रश्न निर्माण करणाऱ्या निवडणूक प्रक्रियेबाबत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही दीपके यांनी केली. मतदानाचा अधिकार, लोकशाही आणि महात्मा गांधी यांच्या विचारांच्या रक्षणासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी केला. महात्मा गांधी हे देशाचा आत्मा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाचा कणा आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे मन असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. दीपके म्हणाले, ‘मोदी स्वतःला ‘नॉन-बायोलॉजिकल’ आणि ‘विश्वगुरू’ मानतात. परदेश दौऱ्यांदरम्यान पंतप्रधानांचा उल्लेख ‘पीएम ऑफ गांधीज नेशन’ असा केला जातो. पंतप्रधानांनी स्वतःची तुलना महात्मा गांधी यांच्याशी करू नये.’ महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी हे आंदोलनात सहभागी झाले होते. देशातील प्रत्येक क्रांतीची सुरुवात मुंबईतून होते आणि आजचा दिवसही क्रांतिकारी असल्याचे त्यांनी म्हटले. शिवाजी पार्कवरील आंदोलनाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
--
माेदींच्या धाेरणांमुळे कुटुंबे उद्ध्वस्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर टीका करताना दीपके यांनी नोटबंदीपासून कोरोना काळापर्यंत विविध निर्णयांचा संदर्भ दिला. ‘मोदींना दुसरे काही काम येत नाही, फक्त लोकांना रांगेत उभे करता येते,’ अशी टीका त्यांनी केली. मोदी स्वतःला गरीब आईचा मुलगा म्हणतात; मात्र त्यांच्या धोरणांमुळे देशातील अनेक कुटुंबांवर आर्थिक अडचणी ओढवल्याचा आरोपही त्यांनी केला.
--
‘मताधिकार हा आपला आवाज’
अभिनेत्री शबाना आझमी यांनी ‘आपले मत म्हणजे आपला अधिकार आणि आपला आवाज आहे; मात्र आपले मतच हिरावून घेतले गेले किंवा मतदार यादीतून नाव वगळले गेले, तर आपण काय करणार,’ असा सवाल आझमी यांनी उपस्थित केला. अशा परिस्थितीत आंदोलन करणे हा नागरिकांचा अधिकार असल्याचे त्यांनी नमूद केले.
--
मोदींचे राजकारणाचे ‘दुकान’!
सीजेपीचे आशुतोष रांका यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘ज्ञानेशकुमार, इट्स डन ब्रो’ या घोषणेने करून रांका यांनी शिवाजी पार्कबाहेरील गर्दीचा उल्लेख केला. या गर्दीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धक्का बसेल, असा दावा त्यांनी केला. तसेच भारतात मोदींचे राजकारणाचे ‘दुकान’ सुरू असून, ते चालवण्यामागे ज्ञानेशकुमार यांचा हात असल्याचा आरोपही रांका यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.