

द्रोणागिरी नोडमध्ये गटारे तुंबली; मलमिश्रित पाणी रस्त्यावर
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; सिडकोच्या दुर्लक्षामुळे रहिवाशांमध्ये नाराजी
उरण, ता. ४ (बातमीदार) : तालुक्यातील सिडको विकसित द्रोणागिरी नोडमधील रहिवाशांना सध्या विविध नागरी समस्यांचा सामना करावा लागत आहे. सिडको प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिसरातील गटारे तुंबली असून, त्यातून मलमिश्रित सांडपाणी थेट मुख्य रस्त्यावर वाहत आहे. यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
उरण तालुका झपाट्याने विकसित होत असून, उरण रेल्वे तसेच अटल सेतूमुळे मुंबई, नवी मुंबई आणि इतर भागांशी दळणवळण अधिक सुलभ झाले आहे. या पार्श्वभूमीवर द्रोणागिरी नोडमध्ये सिडकोकडून मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली आहेत. सेक्टर ४७ ते ५४ या परिसरात अनेक मोठमोठ्या इमारती आणि टॉवर उभे राहिले असून, त्यामध्ये मोठ्या संख्येने रहिवासी वास्तव्यास आले आहेत, मात्र या तुलनेत मूलभूत नागरी सुविधांकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची तक्रार रहिवाशांकडून केली जात आहे. विशेषतः सेक्टर ५३ आणि ५४ मध्ये परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. रस्त्याच्या मध्यभागी असलेली गटारे तुंबल्याने त्यातील मलमिश्रित सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे नागरिकांना या सांडपाण्यातून मार्ग काढावा लागत असून, दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे परिसरातील आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सांडपाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून पादचाऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सिडको प्रशासनाने तातडीने तुंबलेली गटारे स्वच्छ करून सांडपाण्याचा निचरा सुरळीत करावा, तसेच रस्त्यांची आवश्यक दुरुस्ती व सुधारणा करावी, अशी मागणी द्रोणागिरी नोडमधील रहिवाशांकडून जोर धरू लागली आहे.
या परिसरात गटारे तुंबलेल्या अवस्थेत असून, त्यातील पाणी रहदारीच्या रस्त्यावर वाहत आहे. ज्येष्ठ, विद्यार्थी मुख्य रस्ता असल्याने येथूनच ये-जा करीत आहेत. त्यामुळे सर्वांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहे. सिडकोने या गंभीर समस्यकडे त्वरित लक्ष केंद्रित करावे.
- रोहन पाटील
या समस्या सोडविण्यासाठी आम्ही द्रोणागिरीचे कार्यकारी अभियंता यांना सूचना दिल्या आहेत. त्या लवकरच मार्गी लागतील.
- सुनील देवरे, अभियंता, सिडको
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.