नवी मुंबईत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’

नवी मुंबईत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’
Published on: 

नवी मुंबईत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’; घोषवाक्य व काव्य सादरीकरण स्पर्धेचे आयोजन

जुईनगर, ता. ४ (बातमीदार) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ३ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहानिमित्त नागरिकांमध्ये मराठी भाषेविषयी अभिमान, जनजागृती आणि सामाजिक विषयांबाबत सकारात्मक संदेश पोहोचविण्यासाठी ‘मराठी घोषवाक्य/संदेश स्पर्धा’ तसेच ‘अभिजात मराठी काव्य सादरीकरण स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.

‘मराठी भाषा समृद्ध महाराष्ट्र’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या घोषवाक्य व संदेश स्पर्धेत मराठी भाषा संवर्धन, स्वच्छता, पर्यावरण, प्लॅस्टिक प्रतिबंध आणि आरोग्य या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धकांनी प्रत्येक विषयावर एक घोषवाक्य किंवा जनजागृतीपर काव्यातील संदेश मराठी भाषेत पाठवायचा आहे. प्रत्येक विषयासाठी जास्तीत जास्त पाच ओळींचा संदेश अपेक्षित आहे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक विषयातील सर्वोत्कृष्ट घोषवाक्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या कल्पकतेला आणि मराठी भाषेतील लेखनकौशल्याला वाव देत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

सप्ताहाचा एक भाग म्हणून ‘अभिजात मराठी काव्य सादरीकरण स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा ऑक्टोबर (ता. ९) रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. सहभागी स्पर्धकांनी अभिजात मराठी भाषेतील नामवंत कवींच्या आपल्या आवडत्या एका कवितेचे कमाल पाच मिनिटांत सादरीकरण करणे अपेक्षित आहे.

काव्य सादरीकरण स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी तीन हजार रुपये किमतीची ग्रंथभेट, द्वितीय क्रमांकासाठी अडीच हजार रुपये किमतीची ग्रंथभेट, तर तृतीय क्रमांकासाठी दोन हजार रुपये किमतीची ग्रंथभेट देण्यात येणार आहे. याशिवाय उत्तेजनार्थ पाच पारितोषिके प्रत्येकी एक हजार रुपये किमतीच्या ग्रंथभेटीच्या स्वरूपात देण्यात येणार आहेत.

महापालिका अधिकारी-कर्मचारी, नवी मुंबईकर नागरिक तसेच इतर इच्छुकांसाठीही या उपक्रमात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मराठी भाषेचा गौरव, संवर्धन आणि सामाजिक विषयांवरील जनजागृती या दुहेरी उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नवी मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.

या दोन्ही उपक्रमांसाठी प्रवेश विनामूल्य असून, नवी मुंबईतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ९९३००२०८१४ या क्रमांकावर संपर्क साधून नावनोंदणी करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com