जे.जे.मध्ये ट्यूमर, प्रोस्टेटवर शस्त्रक्रिया टाळून उपचाराची सोय

जे.जे.मध्ये ट्यूमर, प्रोस्टेटवर शस्त्रक्रिया टाळून उपचाराची सोय
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय व जे. जे. रुग्णालय समूहातील रुग्णांना आता काही आजारांवर मोठी शस्त्रक्रिया न करता उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रुग्णालयाच्या मूत्रविज्ञान विभागासाठी रोबोटिक ‘हाय इंटेन्सिटी फोकस्ड अल्ट्रासाऊंड’ (हिफू) यंत्र खरेदी करण्यास राज्य सरकारने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या यंत्रासाठी ३३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

हिफू तंत्रज्ञानामध्ये शरीरावर मोठी चिरफाड न करता ध्वनिलहरींच्या साह्याने आजारग्रस्त भागावर उपचार केला जातो. या लहरी विशिष्ट ठिकाणी केंद्रित केल्याने तेथे उष्णता निर्माण होते आणि त्याद्वारे आजारग्रस्त उती नष्ट करण्यास मदत होते. रोबोटिक यंत्रणेमुळे उपचाराचे लक्ष्य अधिक अचूकपणे निश्चित करता येणार आहे.

पारंपरिक शस्त्रक्रियेच्या तुलनेत काही रुग्णांमध्ये या उपचारामुळे मोठी चिरफाड टाळता येऊ शकते. त्यामुळे रक्तस्राव कमी होणे, रुग्णालयात दाखल राहण्याचा कालावधी कमी होणे आणि दैनंदिन जीवनाकडे लवकर परतणे असे संभाव्य फायदे होऊ शकतात, मात्र हे फायदे प्रत्येक रुग्णाला मिळतीलच असे नाही.

ट्यूमर, प्रोस्टेटच्या उपचारात उपयोग
जे. जे. रुग्णालयातील मूत्रविज्ञान विभागात या तंत्रज्ञानाचा विशेषतः प्रोस्टेटशी संबंधित आजार आणि काही प्रकारच्या ट्यूमरच्या उपचारासाठी उपयोग होण्याची अपेक्षा आहे, मात्र कोणत्या रुग्णाला हिफू उपचार द्यायचा, हे आजाराचे स्वरूप आणि रुग्णाच्या स्थितीनुसार डॉक्टर ठरवतील.

तीन कंपन्यांकडून निविदा
हिफू यंत्राच्या खरेदीसाठी किमान तीन उत्पादक किंवा पुरवठादारांकडून निविदा मागविण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यंत्राची खरेदी बाजारभावापेक्षा अधिक दराने होऊ नये, याची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com