पीक नुकसानीचे पंचनामे सुरू

पीक नुकसानीचे पंचनामे सुरू
Published on: 

पीक नुकसानीचे पंचनामे सुरू
शेतातील पाहणीला संयुक्त पथके; ६७० हेक्टर भात क्षेत्राचा समावेश
श्रीवर्धन, ता. ४ (वार्ताहर) : राज्यात जाहीर झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन तालुक्यात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून वेगाने सुरू करण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त क्षेत्राची अचूक माहिती संकलित करण्यासाठी कृषी विभाग आणि महसूल प्रशासनाने विशेष यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
शासनाच्या निर्देशानुसार पंचनामे करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांची संयुक्त पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके गावागावांत प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करीत आहेत. ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेती व पिकांची माहिती शासनाने निश्चित केलेल्या नमुन्यात नोंदविली जात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नुकसानीची स्थिती समोर येण्यास मदत होणार आहे.
तालुक्यात साधारण ६७० हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड करण्यात आली आहे. सध्या पंचनाम्याचे काम सुरू असल्याने नुकसानीचा अंतिम आकडा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. पंचनाम्याद्वारे संकलित झालेली सर्व माहिती एकत्रित करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर नियमानुसार पात्र बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईची रक्कम वर्ग केली जाणार आहे.
शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून पंचनामा प्रक्रिया राबविण्यात येत असून, पात्र लाभार्थी शासकीय मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रशासनाची दक्षता कायम
पंचनाम्याच्या कामात अचूक नोंदणी आणि पात्र लाभार्थ्यांचा समावेश याला प्राधान्य देण्यात आले आहे. याबाबत तहसीलदार महेंद्र वाकलेकर म्हणाले, तालुक्यात संयुक्त पथकांद्वारे पंचनाम्याचे काम वेगाने सुरू आहे. एकही पात्र शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, या दृष्टीने प्रशासन पूर्ण खबरदारी घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com