‘संगम सदन’चा गॅलरीचा भाग कोसळल्याने इमारत रिकामी

‘संगम सदन’चा गॅलरीचा भाग कोसळल्याने इमारत रिकामी
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : वागळे इस्टेटमधील किसननगर क्रमांक एक परिसरातील संगम सदन इमारतीच्या टेरेसवरील गॅलरीचा सज्जा आज (ता. ४) दुपारी अचानक कोसळला. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, या दुर्घटनेत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चार दुचाकींचे नुकसान झाले. गॅलरीचा उर्वरित भाग धोकादायक स्थितीत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली.

वागळे इस्टेट परिसरातील शिवाजीनगर पोलिस चौकीसमोर असलेल्या संगम सदन इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळल्याची माहिती दुपारी २.२२ वाजता ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली. ही इमारत तीन मजली असून, सुमारे २८ वर्षे जुनी आहे. इमारतीचा समावेश ‘सी-२ बी’ प्रवर्गात असून, रहिवाशांनी इमारतीत राहूनच दुरुस्ती करावी, अशा स्वरूपात तिचे वर्गीकरण करण्यात आले आहे.
इमारतीमध्ये २७ सदनिका आणि चार गाळे असून, सुमारे ८० रहिवासी वास्तव्यास आहेत.

या घटनेची माहिती मिळताच ठाणे पालिकेचे अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अतिक्रमण नियंत्रण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वागळे प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त राजेश सोनवणे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वाय. एम. तडवी यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आमदार रवींद्र फाटक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनीही घटनास्थळी भेट दिली.

२० कुटुंबांची हाजुरीत व्यवस्था
गॅलरीचा उर्वरित भाग धोकादायक असल्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी इमारत रिकामी करण्यात आली. त्यानंतर २० कुटुंबांच्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्था हाजुरी येथील रेंटल इमारतीत करण्यात आली. उर्वरित रहिवाशांनी नातेवाइकांकडे राहण्याची व्यवस्था केली आहे. पुढील आवश्यक कार्यवाही वागळे प्रभाग समिती आणि बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे, असे आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com