ठाणे, पालघरमध्ये पानमसाला तस्करी जोमात

ठाणे, पालघरमध्ये पानमसाला तस्करी जोमात
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईतून समोर आले आहे. येवई ब्रिज, चारोटी आणि डोंबिवली परिसरात करण्यात आलेल्या तीन कारवायांमध्ये दोन कोटी ६९ लाख २९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूसह तीन वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. या व्यवहारामागे मोठे जाळे कार्यरत आहे का, याबाबतचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

ठाणे झोन-१० अंतर्गत येवई ब्रिज परिसरात शुक्रवारी (ता. २) प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला. यामध्ये पानमसाल्याची एकूण ५५ हजार ८० पाकिटे आढळली. या पदार्थांची किंमत ८१ लाख ५१ हजार रुपये आहे. सुमारे २० लाखांचा ट्रकही जप्त करण्यात आल्याने या कारवाईतील मुद्देमालाची किंमत एक कोटी एक लाख ५१ हजारांवर पोहोचली.

चारोटीत सात जणांचा सहभाग
पालघरच्या चारोटी टोलनाका परिसरात शुक्रवारी (ता. २) आणि शनिवारी (ता. ३) झालेल्या कारवाईत प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक तसेच विक्रीच्या उद्देशाने साठवणूक होत असल्याचे आढळले. वाहनचालक फिरोज खाजा मिया सय्यद याच्यासह आणखी सहा जणांचा सहभाग आढळला. या कारवाईत ४३ लाख ५० हजारांचे प्रतिबंधित पदार्थ आणि २० लाखांचा ट्रक असा ६३ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी कासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवलीत एक कोटीचा माल
ठाणे झोन-७ अंतर्गत शुक्रवारी केलेल्या कारवाईत ८४ लाख २८ हजारांचे प्रतिबंधित पदार्थ जप्त करण्यात आले. यासोबत सुमारे २० लाखांचे वाहनही ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे या कारवाईत एक कोटी चार लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त झाला. विनय शर्मा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करीत माहितीच्या आधारे मोहम्मद रफिक रती खान (३१) याला अटक करण्यात आली. याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com