

पृथ्वीचे आपण मालक नाही
निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक : संवर्धनासाठी तरुणांनी पुढाकार घ्या
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे पुढील पिढीसमोरील मोठे आव्हान आहे. पृथ्वी ही आपली मालमत्ता नसून आपण तिचे मालक नाही, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांनी रविवारी (ता.४) केले. वृक्षतोड, फटाक्यांमुळे होणारे ध्वनी व वायुप्रदूषण तसेच धार्मिक कारणांमुळे नद्या आणि समुद्राचे होणारे प्रदूषण याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
श्री समर्थ सेवक मंडळ संचलित कै. नी. गो. पंडीतराव वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ओक बोलत होते. शिवदौलत सभागृहात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पर्यावरणाचे संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य असल्याचे घटनेत नमूद आहे; मात्र, पर्यावरणाची उपेक्षा अशीच सुरू राहिल्यास पुढील २० ते २५ वर्षांत मोठ्या शहरांमध्ये कोविडसारखी परिस्थिती नसतानाही नागरिकांना मास्क लावून फिरावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. तरुणांनी पर्यावरणाचा अभ्यास करून जनजागृती करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
---
एआयवर अवलंबून राहू नका
वक्तृत्वासाठी कष्ट, विषयाची तळमळ आणि प्रभावी विचार आवश्यक असतात. संशोधन आणि माहिती मिळविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणे योग्य आहे; मात्र, स्वतःचे विचार मांडण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःची विचारशक्ती विकसित करावी, असे ओक यांनी सांगितले. चांगला वक्ता होण्यासाठी कुठे थांबायचे हेही समजले पाहिजे, अन्यथा श्रोते कंटाळतात, असे त्यांनी नमूद केले.
---
कायदा क्षेत्रात करिअर करा
अभिरूप न्यायालय, वादविवाद आणि निकालपत्र लेखन यांसारख्या विविध स्पर्धांमध्ये मुलींची कामगिरी उल्लेखनीय आहे. देशातील २७ राष्ट्रीय विधी महाविद्यालयांमध्ये ५५ ते ६० टक्के विद्यार्थीनी आहेत. न्यायाधीशांच्या नियुक्त्यांमध्येही महिलांचे प्रमाण वाढत असल्याचे सांगत ओक यांनी विद्यार्थिनींनी कायदा क्षेत्रात करिअर करण्याचे आवाहन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.