पावसाचा जोर ओसरताच पोलादपुरात नदीकिनारी गळाने मासेमारीला पसंती!

पावसाचा जोर ओसरताच पोलादपुरात नदीकिनारी गळाने मासेमारीला पसंती!
Published on: 

पोलादपुरात पारंपरिक मासेमारी तेजीत
खवय्यांची वांब, शिंगटी माशांना पसंती

पोलादपूर, ता. ५ (बातमीदार) : जिल्ह्यातील दुर्गम तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलादपुरातून वाहणाऱ्या सावित्री, ढवळी आणि कामथी या नद्यांमध्ये सध्या पारंपरिक मासेमारीचा हंगाम जोरात सुरू आहे. गणेशोत्सवानंतर पावसाचा जोर ओसरताच स्थानिक नागरिक व आदिवासी बांधव नदीकिनारी गळाच्या सहाय्याने मासेमारीचा आनंद घेत आहेत. सध्या बाजारात चविष्ट मानल्या जाणाऱ्या सापासारख्या दिसणाऱ्या वांब आणि शिंगटी माशांना मोठी पसंती मिळत आहे.
पोलादपुरात बाराही मासेमारी केली जात असली तरी गणेशोत्सवानंतर नदीत मुबलक पाणी असल्याने सप्टेंबर आणि ऑक्टोबर या कालावधीत मिळणाऱ्या वांब आणि शिंगटी माशांना विशेष मागणी असते. गळाने मासेमारी करण्यासाठी पातळ बांबूच्या काठीला तंगूस बांधून त्याला गळ व शिसे लावले जाते. उन्हाळ्यात गळाला पीठ लावून मासेमारी केली जाते, तर पावसाळ्यात गांडुळाचा वापर केला जातो. पावसाळ्यानंतरची ही मासेमारी पोलादपूरकरांच्या विशेष पसंतीची असल्याचे चित्र आहे.
वांब माशाचे वैशिष्ट्य म्हणजे हा मासा वर्षातून केवळ सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांतच मिळतो. उर्वरित १० महिने हा मासा नदीत दिसतही नाही आणि मिळतही नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. दिसायला सापासारखा लांबट असलेला हा मासा चवीला अत्यंत चविष्ट मानला जातो. वर्षातून केवळ दोन महिने मिळणारा आणि तुलनेने चांगला भाव असलेला हा मासा पकडण्यासाठी पोलादपूरमधील स्थानिक नागरिक सायंकाळी गळ घेऊन नदीकाठी बसत आहेत. पोलादपुरात या माशाला ‘सुतेरी’ या नावानेही ओळखले जाते.

वांब माशाच्या विक्रीतून आदिवासींना रोजगार
वांब माशाला चांगला भाव मिळत असल्याने आदिवासी बांधवांसाठी रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत आहे. हा मासा लांब असल्याने त्याचे वजनही चांगले भरते. पोलादपुरात या माशाला ‘सुतेरी’ या नावानेही ओळखले जाते. बाजारपेठेत वांबच्या किलोमागे सुमारे २०० ते २५० रुपये भाव मिळत असल्याने हा मासा बाजारात विक्रीसाठी आणण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. बाजारात हा मासा विक्रीसाठी आल्यानंतर ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडते आणि काही वेळातच उपलब्ध मासे विकले जात असल्याचे चित्र आहे.

वांब या माशाला चांगला भाव मिळत असून, पोलादपुरात नागरिक या माशाची अधिक खरेदी करीत आहेत. त्यामुळे रोजगारही चांगल्या प्रमाणात मिळत आहे.
- नीला चव्हाण, आदिवासी

वांब मासा वर्षातून फक्त दोन महिने नदीत आढळतो. तो अत्यंत चविष्ट असून, चुलीवर त्याचे कालवण केले तर त्याची चव आणखी खुलते. त्याला स्वतः गळाने पकडण्याची एक वेगळीच मजा आहे.
- निवेदन दरेकर, स्थानिक

वांब मासा महाग असला तरी तो अत्यंत चविष्ट आहे. बाजारात हा मासा नेमक्या प्रमाणात उपलब्ध असल्याने मिळेल त्या भावाला आम्ही तो विकत घेतो. कारण इतर वेळी हा मासा पाहायलाही मिळत नाही.
- रोशन दुधाने, ग्राहक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com