

वज्रेश्वरी, ता. ५ (बातमीदार) : ऑक्टोबर हीटचा तडाखा जाणवत असतानाच वज्रेश्वरी, गणेशपुरी, अंबाडी आणि भिवंडी ग्रामीण परिसरातील वाढते काँक्रीटीकरण उकाड्यात भर घालण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्यांचे काँक्रीटीकरण, सिमेंटचे पेव्हर ब्लॉक, वाढती बांधकामे आणि घटणाऱ्या मोकळ्या जागांमुळे परिसरातील नैसर्गिक हिरवाई कमी होत आहे. काँक्रीट व डांबरी पृष्ठभाग दिवसभर सूर्याची उष्णता शोषून घेत असल्याने सायंकाळनंतरही उष्णता जाणवत राहते. त्यामुळे दिवसाबरोबरच रात्रीच्या वेळीही उकाडा कायम राहत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
वज्रेश्वरी, गणेशपुरी, अंबाडी-शिरसाड तसेच भिवंडी ग्रामीण भागातील प्रमुख रस्त्यांच्या परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात बांधकामे आणि काँक्रीटीकरण वाढले आहेत. वाढत्या नागरीकरणामुळे झाडे आणि मोकळ्या जागांचे प्रमाण कमी होत असल्याने स्थानिक पातळीवर उष्णतेचा परिणाम अधिक जाणवण्याची शक्यता आहे. झाडांच्या सावलीमुळे रस्ते आणि परिसरातील पृष्ठभागाचे तापमान तुलनेने कमी राहण्यास मदत होते. मात्र, काँक्रीट आणि डांबरी पृष्ठभाग दिवसभर उष्णता शोषून घेतात आणि ती सायंकाळनंतर हळूहळू वातावरणात सोडतात. त्यामुळे रात्रीही उष्णता राहू शकते. वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि अंबाडी परिसर धार्मिक तसेच पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा आहे. त्यामुळे वाढत्या बांधकामांसोबत पर्यावरणाचा समतोल राखण्याची गरज पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.
पावसाचे पाणी मुरण्यावरही परिणाम
काँक्रीटीकरणाचा परिणाम केवळ उष्णतेपुरता मर्यादित राहत नाही. मोकळ्या जमिनीचे क्षेत्र कमी झाल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाणही घटू शकते. परिणामी, भूजल पुनर्भरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. वज्रेश्वरी-गणेशपुरी परिसरातील नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी मोकळ्या जागा आणि वृक्षसंपदेचे जतन महत्त्वाचे असल्याचे पर्यावरणप्रेमी वैभव पवार यांनी सांगितले.
विकासासोबत पर्यावरणाचे भान
अंबाडी आणि भिवंडी ग्रामीण भागातील वाढती लोकवस्ती, नवीन बांधकामे आणि रस्ते विकास ही काळाची गरज असली तरी त्याचवेळी रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण, उपलब्ध मोकळ्या जागांचे संरक्षण, पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याच्या उपाययोजना आणि पर्यावरणपूरक बांधकाम पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक आहे. विकास आणि पर्यावरणाचा समतोल साधल्यास वज्रेश्वरी-अंबाडी परिसराचा भविष्यातील विकास अधिक शाश्वत आणि नागरिकांसाठी आरोग्यदायी ठरू शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.