मुंबईतील महिलांमध्ये मधुमेहाचा धोका वाढला

मुंबईतील महिलांमध्ये मधुमेहाचा धोका वाढला
Published on: 

मुंबईतील महिलांमध्ये मधुमेहाचा धोका वाढला
४६.८ टक्के एचबीए१सी अहवाल प्री-डायबेटीस किंवा मधुमेहाच्या श्रेणीत; तरुणींमध्येही वाढते प्रमाण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : महिलांच्या आरोग्याबाबत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून चिंताजनक बाब समोर आली आहे. मुंबईतील महिलांच्या रक्तातील साखरेच्या तपासण्यांमध्ये जवळपास निम्म्या अहवालांमध्ये प्री-डायबेटीस किंवा डायबेटीसची स्थिती आढळली आहे. विशेष म्हणजे ही समस्या केवळ ज्येष्ठ नागरिकांपुरती मर्यादित राहिलेली नसून, तरुणांमध्येही रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे.
‘लूप हेल्थ’च्या २०२६च्या आरोग्य विश्लेषण अहवालानुसार, मुंबईतील ८७२ एचबीए१सी तपासण्यांपैकी ४६.८ टक्के अहवाल प्री-डायबेटीस किंवा डायबेटीसच्या श्रेणीत आढळले. पाच प्रमुख महानगरांच्या तुलनेत मुंबईतील हे प्रमाण अधिक असल्याचे अहवालातून समोर आले आहे.
पाच महानगरांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात मुंबईतील प्रौढांच्या विविध वयोगटांमध्ये रक्तशर्करेचे प्रमाण लक्षणीय आढळले. त्यामुळे मधुमेहाचा धोका हा केवळ वयस्कर व्यक्तींशी संबंधित नसून, तरुण पिढीलाही त्याचा सामना करावा लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रत्येक पाचव्या तरुणात वाढलेली रक्तशर्करा
सर्वेक्षणातील सर्वाधिक चिंताजनक बाब म्हणजे २० ते २९ वर्षे वयोगटातील जवळपास प्रत्येक पाचव्या व्यक्तीमध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढलेली आढळली. मुंबईत ६० वर्षे आणि त्यावरील वयोगटात ही समस्या सर्वाधिक असली, तरी कमी वयाच्या व्यक्तींमध्येही वाढत्या रक्तशर्करेचे प्रमाण लक्ष वेधून घेणारे आहे.

महिलांमध्ये ‘चांगले कोलेस्टेरॉल’ कमी
रक्तातील साखरेसोबतच महिलांच्या कोलेस्टेरॉलच्या पातळीबाबतही चिंताजनक चित्र समोर आले आहे. मुंबईतील ४४२ महिलांच्या एचडीएल तपासण्यांपैकी ७८.१ टक्के अहवालांमध्ये एचडीएलची पातळी ५० मिलीग्रॅम/डेसिलिटरपेक्षा कमी आढळली. संपूर्ण महिला नमुन्यात हे प्रमाण ७०.४ टक्के होते. एचडीएल म्हणजे चांगले कोलेस्टेरॉल. मात्र, त्याची पातळी कमी असणे हे एखाद्या व्यक्तीच्या हृदयविकाराच्या जोखमीचे एकमेव निदर्शक नसल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. हृदयविकाराचा धोका ठरविताना इतर आरोग्य घटकांचाही विचार करणे आवश्यक आहे.

हिमोग्लोबिनची पातळीही चिंताजनक
मुंबईतील महिला आणि पुरुषांच्या हिमोग्लोबिन तपासण्यांमध्येही कमी पातळीचे प्रमाण आढळले. पाच महानगरांच्या तुलनेत कमी हिमोग्लोबिनचे अहवाल मुंबईत सर्वाधिक असल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले. यामुळे रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल आणि हिमोग्लोबिन या तिन्ही बाबतीत नियमित आरोग्य तपासणी करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

१७.१ टक्के अहवाल मधुमेहाच्या श्रेणीत
मुंबईतील एचबीए१सी तपासण्यांपैकी १७.१ टक्के अहवालांमध्ये एचबीए१सीची पातळी ६.५ टक्के किंवा त्याहून अधिक आढळली. ही पातळी मधुमेहाच्या श्रेणीत मानली जाते. पाच महानगरांच्या सरासरीच्या तुलनेत मुंबईतील हे प्रमाण अधिक असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले.

ठळक मुद्दे
- मुंबईतील ८७२ एचबीए१सी तपासण्यांपैकी ४६.८ टक्के अहवाल प्री-डायबेटीस किंवा डायबेटीसच्या श्रेणीत
- २० ते २९ वर्षे वयोगटातील जवळपास प्रत्येक पाचव्या व्यक्तीमध्ये रक्तातील साखर वाढलेली आढळली
- ६० वर्षे आणि त्यावरील व्यक्तींमध्ये वाढलेल्या रक्तशर्करेचे प्रमाण सर्वाधिक
- महिलांच्या ७८.१ टक्के एचडीएल अहवालांमध्ये चांगले कोलेस्टेरॉल ५० मिलीग्रॅम/डेसिलिटरपेक्षा कमी
- महिलांमधील कमी हिमोग्लोबिनचे प्रमाणही पाच महानगरांमध्ये मुंबईत सर्वाधिक
मुंबईतील १७.१ टक्के एचबीए१सी अहवालांमध्ये पातळी ६.५ टक्के किंवा त्याहून अधिक म्हणजे मधुमेहाच्या श्रेणीत
- मधुमेहाचा धोका आता केवळ ज्येष्ठांपुरता मर्यादित नसून तरुणांमध्येही वाढत असल्याचे चित्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com