

शाळा बंदीविरोधात एल्गार
राज्यातील विविध संघटनांचे आझाद मैदानात धरणे
मुंबई, ता. ५ : राज्यातील सरकारी, अनुदानित आणि विशेषतः मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत असल्याच्या प्रश्नावरून ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच महाराष्ट्र’च्या वतीने आझाद मैदानात सोमवारी (ता. ५) बेमुदत धरणे आंदोलन करणात आले. राज्यातील विविध विद्यार्थी, शिक्षक, पालक, सामाजिक आणि शैक्षणिक संघटनांच्या सहभागाने झालेल्या या आंदोलनात कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय तातडीने मागे घ्या, १५ मार्च २०२४ चा संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करा, ‘केजी ते पीजी’पर्यंत सर्वांना मोफत व गुणवत्तापूर्ण समान शिक्षण द्या आणि गाव, तांडा, वाडी-वस्ती तिथे शाळा असलीच पाहिजे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
सार्वजनिक शिक्षण व्यवस्था मजबूत करण्याऐवजी शाळा-महाविद्यालये बंद करण्याचे धोरण राबवले जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. शाळा बंद करून शिक्षणाचे प्रश्न सुटणार नाहीत; उलट ग्रामीण, दुर्गम आणि सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न अधिक गंभीर होईल, अशी भूमिका मंचाने मांडली. राज्यात कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाला मंचाने तीव्र विरोध केला आहे. या शाळा बंद करू नये, अशी मागणी करण्यात आली. प्रत्येक वर्गासाठी आणि प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावेत, तसेच रिक्त शिक्षक पदे तातडीने भरावीत, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली. विशेषतः ग्रामीण भागातील गाव, तांडा, वाडी-वस्तीपासून शाळा दूर नेल्यास गरीब, कष्टकरी, शेतकरी, दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, बहुजन आणि अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका वाढेल, असा दावा मंचाने केला. या आंदोलनात प्रयास एक कोशिश, छात्रभारती, सत्यशोधक विद्यार्थी, एसएफआय महाराष्ट्र, एआयएसएफ महाराष्ट्र, सम्यक विद्यार्थी, आयसा महाराष्ट्र, लोकशाही युवा संघटन, एनएसयूआय महाराष्ट्र, विद्रोही विद्यार्थी संघटना यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक आणि सामाजिक क्षेत्रातील विविध कार्यकर्ते सहभागी झाले.
आंदोलनात कॉ. संपत देसाई, संजय वेतुरेकर, सिद्धार्थ जगदेव, दक्षता गंधे, प्रकाश रणसिंग आदींचा सहभाग होता.
दरम्यान, शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच सिंधुदुर्ग यांच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाला मराठी अभ्यास केंद्राचे डॉ. दीपक पवार यांनी पाठिंबा जाहीर केला. या वेळी अभ्यास केंद्राचे कार्यवाह आनंद भंडारे, कोल्हापूर जिल्हा समन्वयक अमोल गवळी उपस्थित होते.
खासगीकरण रोखा!
गुणवत्तापूर्ण शिक्षणावर विपरीत परिणाम करणारा १५ मार्च २०२४ रोजीचा संचमान्यतेचा शासन निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी आंदोलनात करण्यात आली. मान्यताप्राप्त शाळा, तुकड्या, विषय आणि महाविद्यालये बंद न करता त्यांना आवश्यक मनुष्यबळ आणि आर्थिक तरतूद उपलब्ध करून द्यावी, तसेच शासकीय महाविद्यालये बंद करणारे आणि उच्च शिक्षणाच्या खासगीकरणाला प्रोत्साहन देणारे धोरण तातडीने मागे घ्यावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.