

आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच
वेतनवाढ, प्रसूती रजा, पीएफ-ईएसआयसीसह कायम सेवेत घेण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : महापालिकेच्या आरोग्य विभागात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत (एनयूएचएम) कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या सुमारे १,२०० कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानातील बेमुदत आंदोलन ३६व्या दिवशीही सुरू आहे. महापालिका सेवेत कायमस्वरूपी समावेश, वेतनवाढ, सशुल्क प्रसूती रजा, बोनस, भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) आणि कर्मचारी राज्य विमा योजनेचा (ईएसआयसी) लाभ मिळावा, या प्रमुख मागण्या आहेत. आंदोलनामुळे बाह्यरुग्ण सेवा, बालकांचे लसीकरण, मलेरिया-डेंगी तपासणी, एचआयव्ही तपासणी, कुटुंब नियोजन आणि गर्भवतींची नोंदणी यांसह विविध आरोग्यविषयक कामांवर परिणाम झाल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे.
या कर्मचाऱ्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, एएनएम, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माते, माहिती नोंदणी कर्मचारी, परिचर आणि समाजसेवकांचा समावेश आहे. अनेक कर्मचारी २०१६ पासून महापालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत असून, कोरोना काळातही त्यांनी सेवा बजावली, मात्र जवळपास दशकभर सेवा करूनही नियमित सेवेत समावेश झालेला नसल्याची त्यांची तक्रार आहे.
सुधारित किमान वेतनानुसार थेट वेतनवाढ, सशुल्क प्रसूती रजा, दिवाळी सानुग्रह अनुदान, पीएफ-ईएसआयसीचे लाभ देण्याबरोबरच वेतनविलंबाबाबत कंत्राटदाराला ताकीद देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. कार्यकारी आरोग्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती कार्यान्वित करण्यासही सांगण्यात आले आहे.
कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेकांना १८ ते २० हजार रुपये मासिक वेतन मिळते. अनेक वर्षांपासून वेतनवाढ झालेली नाही. दरम्यान, बुधवारी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासोबत बैठक होणार आहे. मागण्यांवर निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
महापौरांकडून मागण्यांची दखल
महापौर ऋतु तावडे यांनी सोमवारी आंदोलनस्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा लवंगारे यांना पत्र देऊन १० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या अनुभवी कंत्राटी कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर एकदाच विशेष धोरणाद्वारे नियमित सेवेत सामावून घेण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.