कुष्ठरोगाचा विळखा कायम

कुष्ठरोगाचा विळखा कायम
Published on: 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ६ : महाराष्ट्र कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असतानाही राज्यातील कुष्ठरोगाचे अस्तित्व कायम असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. २०१५-१६ ते २०२५-२६ या कालावधीत राज्यात तब्बल एक लाख ५७ हजार २६९ नवीन कुष्ठरुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी, ४४ हजार ३६७ रुग्ण कुष्ठरोग शोधमोहिमेसह ‘एसीडीआरएस’च्या माध्यमातून आढळले आहेत. त्यामुळे रुग्णांचा शोध घेण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या मोहिमांची व्याप्ती वाढविण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

कुष्ठरोगाचे वेळेत निदान होऊन उपचार सुरू झाल्यास विकृती टाळणे शक्य होते. त्यामुळे नवीन रुग्णांचा शोध घेणे आणि त्यांना उपचाराखाली आणणे याला विशेष महत्त्व आहे, मात्र शोध मोहिमांमध्ये दरवर्षी आढळणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता आजही अनेक रुग्ण आरोग्य यंत्रणेपर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र आहे.

२०१५-१६ मध्ये शोधमोहिमेत केवळ १६६ रुग्ण आढळले होते. त्यानंतर ही संख्या वाढत गेली. २०१६-१७ मध्ये ४,१३४, २०१७-१८ मध्ये ५,०७३, २०१८-१९ मध्ये ५,२६८ आणि २०१९-२० मध्ये ६,११६ रुग्ण आढळले. २०२२-२३ मध्ये ६,७३१, तर २०२३-२४ मध्ये ६,७४४ रुग्णांची नोंद झाली. २०२५-२६ मध्येही शोधमोहिमेत ६,३०९ रुग्ण आढळले.

रुग्णाची माहिती देणे बंधनकारक
कुष्ठरोगाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने ३० ऑक्टोबर २०२५पासून या आजाराचा ‘अधिसूचित आजार’ म्हणून समावेश केला आहे. त्यामुळे शासकीय, खासगी, अशासकीय संस्था तसेच खासगी डॉक्टरांना निदान झालेल्या प्रत्येक कुष्ठरुग्णाची माहिती आरोग्य विभागाला देणे बंधनकारक झाले आहे.

आशा सेविकांना प्रोत्साहन
नवीन रुग्णांचा शोध आणि उपचार पूर्ण करण्यासाठी आशा सेविकांना मानधन दिले जाते. विकृती नसलेला नवीन रुग्ण शोधल्यास २५० रुपये, तर विकृती असलेला रुग्ण शोधल्यास २०० रुपये मानधन मिळते. सांसर्गिक रुग्णाचा उपचार पूर्ण केल्यास ६०० रुपये, तर असांसर्गिक रुग्णाचा उपचार पूर्ण केल्यास ४०० रुपये दिले जातात. कुष्ठरोगामुळे निर्माण झालेल्या विकृतींवर पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियेसाठी ५ हजार रुपयांचे अनुदान देण्याचीही तरतूद आहे. स्वयंभू कुष्ठवसाहतींमध्ये रुग्णांच्या जखमांवर ड्रेसिंग करणाऱ्या ड्रेसरलाही वाढीव मानधन देण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com