

दांडियासाठी कपडे, दागिन्यांना वाढली मागणी
नेरूळ, ता. ६ (बातमीदार) ः नवरात्रोत्सव हा रंग, उत्साह आणि संस्कृतीचा उत्सव आहे. आगामी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील विविध बाजारपेठा रंगीबेरंगी कपडे, आकर्षक दागिने आणि फॅशन ॲक्सेसरीजने गजबजून गेल्या आहेत. गरबा आणि दांडिया रात्रींसाठी पारंपरिक तसेच फ्युजन पोशाख आणि दागिन्यांच्या खरेदीसाठी महिला व तरुणींची बाजारपेठेत गर्दी दिसून येत आहे.
बाजारपेठांमध्ये विविध रंगांच्या चनिया चोळी, घागरा-चोळी, कुर्ती, लेहंगा तसेच पुरुषांसाठी कुर्ता-पायजमा, केडिया, जॅकेट, धोती, डोक्यावर रंगीत फेटा किंवा पगडी यांसारख्या कपड्यांना मागणी आहे. राजस्थानी पद्धतीच्या या पगडीला साफा म्हणतात. नवरात्रीच्या पारंपरिक पोशाखांसोबतच यंदा डिझाईन केलेल्या आकर्षक टोपी आणि बॅगचा ट्रेण्ड पाहायला मिळत आहे. गरबा-दांडिया कार्यक्रमांसाठी विविध रंग, नक्षी आणि मिरर वर्क असलेल्या टोपी तसेच पोशाखाला साजेशा छोट्या डिझाईनर बॅगना तरुणाईकडून पसंती मिळत आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी वेगवेगळ्या रंगांचे कपडे परिधान करण्याची परंपरा असल्याने ग्राहकांकडून विविध रंगांच्या पोशाखांना विशेष पसंती मिळत आहे.
नवरात्रीकरिता दागिन्यांचे प्रकार
नेकलेस : चोकर नेकलेस, रंगीबेरंगी डिझाइन असलेला लांब हारदेखील गरबा-दांडियासाठी लोकप्रिय पर्याय आहेत.
बांगड्या : पारंपरिक बांगड्या काचेच्या, धातूच्या किंवा लाखेच्या बनवलेल्या असतात. नवरात्रीनिमित्त मधुर आवाज येण्यासाठी बांगड्यांना लटकन लावतात.
झुमके, मांग टीक्का : लटकणारे आणि रंगीबेरंगी कानातले हा लोकप्रिय पर्याय आहे. कपाळाच्या मध्यभागी असलेला मांग टीक्का हा दागिना धारण केल्यास राजस्थानी पेहरावात अधिक खुलून दिसतो.
पैंजण : घुंगरू असलेल्या पैंजणाची क्रेझ या उत्सवात अधिक असते.
नवरात्रीसाठी विविध पारंपरिक व ऑक्साईडाइज्ड ज्वेलरी उपलब्ध आहे. यावर्षी बाजारात आर्टिफिशियल ज्वेलरीचे नवे दालन खुले झाले आहे. अगदी ५० रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत विविध दागिन्यांचे प्रकार आहेत. नवरात्रीनिमित्त खरेदी केल्यास ज्वेलरीवर खास डिस्काउंटही देण्यात येत आहे.
- आयुषी रावत, ज्वेलरी विक्रेती,
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.