

प्रथम संदर्भ रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर वाहतूक कोंडी
रिक्षांची बेशिस्त रांग, दुहेरी पार्किंगमुळे रुग्णवाहिकांनाही अडथळा
कोपरखैरणे, ता. ६ (बातमीदार) : वाशी येथील पालिकेच्या प्रथम संदर्भ रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. रिक्षाचालकांकडून रस्त्याच्या कडेला लावण्यात येणाऱ्या बेशिस्त दुहेरी रांगा, दुचाकींचे अस्ताव्यस्त पार्किंग आणि पदपथांवरील अतिक्रमणामुळे या परिसरात कोंडी नित्याचीच बाब बनली आहे. याचा फटका आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना बसत आहे.
वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर रिक्षाचालक प्रवाशांच्या प्रतीक्षेत उभे असतात. अनेक वेळा एकामागोमाग एक अशा शिस्तबद्ध रांगेऐवजी दुहेरी रांगेत रिक्षा उभ्या राहत असल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध जागा कमी होते. त्यातच या परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहने रस्त्याकडेला तसेच पदपथावर उभी केली जात असल्याने वाहतुकीचा प्रश्न अधिकच बिकट बनला आहे.
रुग्णवाहिकांना अडथळ्यांचा सामना
रुग्णालय परिसर असल्याने या ठिकाणी रुग्णवाहिकांची सतत ये-जा सुरू असते, मात्र रिक्षा आणि इतर वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे रुग्णवाहिकांना रुग्णालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचताना अडथळ्यांचा सामना करावा लागण्याची परिस्थिती निर्माण होते. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेला काही मिनिटांचा विलंबदेखील महत्त्वाचा ठरू शकतो, त्यामुळे या वाहतूक व्यवस्थेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
ध्वनिप्रदूषणाचाही त्रास
या परिसरात शाळा-महाविद्यालये, रहिवासी सोसायट्या आणि रुग्णालयामुळे दिवसभर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांकडून कर्णकर्कश हॉर्न वाजविण्याचे प्रकार घडतात. परिणामी, परिसरातील नागरिक तसेच रुग्णालयातील रुग्णांना ध्वनिप्रदूषणाचाही त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक किशोर पाटकर यांनी प्रशासनाचे पत्राद्वारे या समस्येकडे वारंवार लक्ष वेधले होते. रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेले प्रवेशद्वार सुरू करून सध्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरील वाहतुकीचा ताण कमी करावा, अशी मागणीही करण्यात आली होती. तसेच, परिसरात बहुमजली पार्किंग सुविधा उपलब्ध करण्याची मागणीही त्यांनी केली.
कारवाईनंतर परिस्थिती जैसे थे
वाहतूक पोलिसांनी तब्बल दोन महिने दोन कर्मचारी याठिकाणी तैनात करून बेशिस्त रिक्षाचालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी दंडदेखील आकारण्यात आला, मात्र आता वाहतूक पोलिस नसल्याने येथील परिस्थिती जैसे थे झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.