

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ६ : उल्हासनगर महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून महायुतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला असताना, शेजारच्या कल्याण-डोंबिवली महापालिकेत मात्र सध्या राजकीय शांततेचा पडदा कायम आहे. उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेतील मतभेद उघडपणे समोर येत असताना, कल्याण-डोंबिवली पालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा निर्णय अद्याप लांबणीवर पडल्याचे चित्र आहे. मात्र ही शांतता केवळ शांतता नसून, इच्छुकांच्या मोठ्या संख्येमुळे निर्माण झालेली राजकीय कोंडी असल्याची चर्चा महायुतीच्या गोटात आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवकांच्या जागांवरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. उपलब्ध राजकीय चर्चेनुसार शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी पाच, तर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेला प्रत्येकी एक जागा देण्याचे सूत्र चर्चेत असल्याचे बोलले जात आहे. हे सूत्र अंतिम झाले तर सत्ताधारी महायुतीतील दोन्ही प्रमुख पक्षांना आपल्या इच्छुकांमधून निवड करताना मोठी कसरत करावी लागणार आहे.
विशेषतः भाजपमध्ये स्वीकृत नगरसेवकपदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. सुमारे ६० जण या पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पाच जागांसाठी निवड करताना उर्वरित इच्छुकांची नाराजी ओढवून घेण्याचा धोका पक्षासमोर आहे. ज्याला संधी मिळेल तो समाधानी; मात्र ज्याचे नाव अंतिम यादीत नसेल त्याची पुढील राजकीय भूमिका काय असेल, याचाही विचार पक्षश्रेष्ठींना करावा लागत आहे.
शिवसेनेची स्थितीही फारशी वेगळी नाही. पक्षाकडेही स्वीकृत नगरसेवकपदासाठी अनेक इच्छुक असल्याने कोणाला संधी द्यायची आणि कोणाला थांबवायचे, हा पेच कायम आहे. महापालिकेतील सत्तासमीकरणात प्रत्येक नगरसेवकाचे महत्त्व लक्षात घेता, एका निर्णयामुळे पक्षांतर्गत नाराजी वाढू नये याची दक्षता घेतली जात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. त्यामुळेच उल्हासनगरमध्ये स्वीकृत नगरसेवकांच्या मुद्द्यावरून महायुतीतील संघर्ष उफाळून आला असताना, कल्याण-डोंबिवलीतील नेत्यांकडून सावध पावले टाकली जात आहेत. निर्णय घ्यायचा, मात्र त्यातून नाराजांची फळी निर्माण होऊ द्यायची नाही, अशी भूमिका असल्याचे चित्र आहे.
उल्हासनगरचा संघर्ष कल्याण-डोंबिवलीपर्यंत पोहोचतो की महापालिकेतील अळीमिळी गुपचिळी कायम राहते, हे स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीच्या निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहे.
इच्छुकांचे मन राखण्याचे आव्हान
दरम्यान, महापालिकेच्या निवडणुकीनंतरही भाजप आणि शिवसेनेतील सत्तासमीकरणाचे अनेक पदर कायम आहेत. निवडणुकीत शिवसेनेला ५३ आणि भाजपला ५० जागा मिळाल्या असून, मनसेच्या पाच नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने महापालिकेतील समीकरणाला वेगळे वळण मिळाले. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीत कोणाला किती वाटा मिळतो, यापेक्षा त्यातून कोण नाराज होतो, हेच आगामी राजकारणाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.
वरिष्ठांकडून संयमाची भूमिका
उल्हासनगरमध्ये महायुतीतील मतभेद उघडपणे समोर येत असताना, कल्याण-डोंबिवलीत मात्र सध्या नेत्यांकडून संयमाची भूमिका घेतली जात आहे. स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा निर्णय लांबवून प्रत्येक इच्छुकाला आशावादी ठेवायचे आणि कुणाचीही नाराजी उघडपणे ओढवून घ्यायची नाही, असा हा राजकीय सावधपणाचा डाव आहे का, हा प्रश्न सध्या महापालिकेच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.