

कल्याण, ता. ७ (बातमीदार) : शहरात तरुणाईला विळखा घालत असलेल्या अमली पदार्थांच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी कल्याण पोलिस आणि गुन्हे शाखेने संयुक्तपणे मोठी मोहीम हाती घेतली आहे. दोन दिवसांत कल्याणमधील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढणाऱ्या तब्बल नऊ जणांवर कारवाई करत पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या कारवायांमध्ये संशयितांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून गांजा भरलेली चिलिम, अर्धवट जळालेला गांजा, काडीपेटी आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यांची रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे.
कल्याण पश्चिमेकडील बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत, एफ.एफ.सी मार्केट, भाजी मंडी आणि इंडियन ऑइल पेट्रोलपंपाच्या मागे गांजाचे सेवन करताना शाकीर शेख (वय ३७) याला गुन्हे शाखा घटक-३ च्या पथकाने रंगेहाथ पकडले. बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने एपीएमसी भाजी मार्केट इमारतीजवळ, शिवमल्हार कंपनीच्या गाळ्यासमोर इब्राहिम सोलकर (वय २६) याला चिलिममधून गांजा ओढताना ताब्यात घेतले. कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत, कैलासनगर येथील गॅस गोदामाजवळील मोकळ्या जागेत सतीश पाटील (वय ३४) याला तंबाखूमिश्रित गांजाचे सेवन करताना अटक करण्यात आली.
विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळील पदपथावर, मासूम बेकरीसमोर सद्दाम शेख (वय २७, रा. उल्हासनगर) या मजुराला गांजा ओढताना कोळसेवाडी पोलिस ठाणे हद्दीत पकडण्यात आले. कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याच्या गस्ती पथकाने नीलम गल्ली, संतोष हॉटेलच्या पार्किंगमध्ये रात्रीच्या सुमारास धाड टाकली. येथे जळगाव जिल्ह्यातील राहुल भालेराव आणि सिद्धार्थ अहिरे (वय २१) तसेच महेंद्र शिंदे (वय २७) यांना गांजा ओढताना रंगेहाथ पकडण्यात आले.
गुन्हे शाखा घटक-३ च्या पथकाने खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आंबिवली पश्चिमेकडील इराणी पाडा, स्टार बेकरीजवळ रोहित शेलार (वय २०) याला चिलिम ओढताना अटक केली. वडवली गाव, गावदेवी मंदिराजवळ अक्षय सोनार (वय २३) याला गांजा ओढताना पकडून कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.