

नवरात्रोत्सवात रंगणार श्रीरामांच्या आदर्शांची गाथा
चेंबूर ते घाटकोपरपर्यंत पाच ठिकाणी रामलीलांची तयारी; आधुनिक तंत्रज्ञानासह भव्य आयोजन
घाटकोपर, ता. ६ (बातमीदार) ः नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरासह पूर्व उपनगरांमध्ये रामलीला महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांच्या जीवनचरित्रातील प्रसंगांचे सादरीकरण करण्यासाठी विविध ठिकाणी भव्य मंडप उभारण्यात येत असून, आकर्षक विद्युत रोषणाई, एलईडी स्क्रीन, प्रोजेक्टर आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून यंदाची रामलीला अधिक भव्य स्वरूपात सादर करण्यात येणार आहे. हिंदी भाषिकांची मोठी वस्ती असलेल्या चेंबूर ते घाटकोपर परिसरात यंदा पाच ठिकाणी रामलीलांचे आयोजन करण्यात आले आहे.
घाटकोपर पूर्वेतील आचार्य अत्रे मैदानात संकल्प सेवा ट्रस्टतर्फे आयोजित रामलीला यंदा १२ व्या वर्षात प्रवेश करत आहे. यानिमित्त सोमवारी भूमिपूजन करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष विजय पुराणिक आणि राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली रामलीलेचे आयोजन करण्यात येत आहे. या रामलीलेत एलईडी स्क्रीन, प्रोजेक्टर आदी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. तसेच मुलांसाठी रामायणावर आधारित सामान्यज्ञान स्पर्धेचेही आयोजन केले जाणार आहे. नव्या पिढीमध्ये भारतीय संस्कृती, धर्म, आस्था आणि चांगले संस्कार रुजविणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
चेंबूर येथील गांधी मैदानात श्री मर्यादा पुरुषोत्तम रामलीला समितीतर्फे ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान रामलीलेचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत रामलीलेचे सादरीकरण होणार आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या काळात पूर्व उपनगरांतील नागरिकांना भगवान श्रीराम यांच्या जीवनचरित्रातील विविध प्रसंगांचा अनुभव घेता येणार आहे.
गावदेवीतील रामलीलेचे ५० वे वर्ष
घाटकोपर पश्चिमेतील गावदेवी परिसरात उत्तर भारतीय सेवा मंडळातर्फे आयोजित ‘श्री सार्वजनिक रामलीला महोत्सवा’चे यंदा ५० वे वर्ष आहे. गेल्या ४९ वर्षांपासून या रामलीलेची परंपरा अखंडपणे सुरू आहे. मंडळाचे अध्यक्ष संजय सिंह, मिर्झा यादव, राजेंद्र पांडेय आणि ओमप्रकाश यादव यांच्या नेतृत्वाखाली आयोजनाची तयारी सुरू आहे.
माणिकलाल मैदानात ‘हायटेक’ रामलीला
घाटकोपर पश्चिमेतील माणिकलाल मैदानात श्री रामलीला महोत्सव समितीतर्फे यंदा ६३ व्या वर्षी रामलीलेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रेक्षकांसाठी पाच हजारांहून अधिक खुर्च्यांची व्यवस्था करण्यात येत असून, एलईडी स्क्रीन आणि प्रोजेक्टरच्या माध्यमातून रामलीलेचे सादरीकरण करण्यात येणार आहे. कलाकारांसाठीही अत्याधुनिक तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अध्यक्ष सुनील दामोदर दुबे, ट्रस्ट बोर्डाचे अध्यक्ष अशोक रमापती दुबे आणि संरक्षक मंडळाचे अध्यक्ष रामसूरत पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली मैदानात भव्य डोम मंडप उभारण्याचे काम सुरू आहे.
पार्कसाईटमध्ये ६० वर्षांची परंपरा
विक्रोळी पार्कसाईट येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात श्री रामलीला उत्सव समितीतर्फे रामलीलेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या रामलीलेचे ६० वे वर्ष आहे. अध्यक्ष प्रभाकर चंद्रशेखर शुक्ल आणि राहुल शुक्ल यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात येत आहे. येथे रामलीलेसोबत श्रीराम बारातीची आकर्षक झांकी आणि दसरा मेळा हे विशेष आकर्षण ठरणार आहे. पौराणिक काळाची अनुभूती देणाऱ्या या आयोजनासाठी वाराणसी येथील प्रतीक रामायण प्रचारक रामलीला मंडळाचे कलाकार मुंबईत येणार आहेत.
रामलीलेत अत्याधुनिक तांत्रिक सुविधांचा वापर करण्यात येणार आहे. प्रोजेक्टर, टीव्ही आणि डिजिटल माध्यमातून रामलीलेचा प्रसार केला जाईल.
- सुनील दामोदर दुबे, अध्यक्ष, श्री रामलीला महोत्सव समिती
रामलीलेच्या माध्यमातून सनातन धर्माची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवून मुलांमध्ये चांगले संस्कार विकसित करण्याचा प्रयत्न आहे.
- विजय पुराणिक, अध्यक्ष, संकल्प रामलीला
भगवान श्रीराम यांच्या आदर्श चरित्रातून जीवनमूल्ये आणि संस्कार समाजापर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने गेल्या ५९ वर्षांपासून रामलीलेचे आयोजन सुरू आहे.
- प्रभाकर चंद्रशेखर शुक्ल, अध्यक्ष, श्री रामलीला उत्सव समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.