

गुरुमंत्र
—
दत्तात्रय दळवी, संचालक
मातोश्री, द्वारका विद्यालय आणि वेस्टर्न रिज इंटरनॅशनल स्कूल, कल्याण
—
हजारो विद्यार्थ्यांना घडविण्याचे स्वप्न
दत्तात्रय दळवी यांचा संघर्षमय प्रवास; सर्वांगीण विकासाचे ध्येय
दत्तात्रय दळवी हे कल्याणमधील मातोश्री विद्यालय, द्वारका विद्यालय आणि वेस्टर्न रिज इंटरनॅशनल स्कूलचे संचालक आहेत. प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत स्वतःचा शैक्षणिक प्रवास उभा करणाऱ्या दळवी यांनी तीन खोल्यांतून सुरू केलेली शाळा आज हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे; मात्र हा प्रवास केवळ शाळा उभारण्यापुरता मर्यादित नसून गुणवत्तापूर्ण शिक्षण, क्रीडा, तंत्रज्ञान आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या ध्येयाशी जोडलेला आहे.
दळवी यांनी बीएस्सी पूर्ण केल्यानंतर विविध कंपन्यांत काम केले. त्याच काळात बीएडचे शिक्षण घेतले. शिक्षक म्हणून काम करताना विद्यार्थ्यांशी असलेले नाते अधिक घट्ट झाले. चेंबूर परिसरातील एका शाळेत शिकवताना पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेली शाळा पाहून स्वतःची शाळा सुरू करण्याची कल्पना त्यांच्या मनात आली. सुरुवातीला जागेच्या शोधात अनेक अडचणी आल्या. अखेर १९९७ मध्ये चाळीतील तीन खोल्या भाड्याने घेऊन शाळा सुरू केली. पहिल्याच वर्षी सुमारे ३०० विद्यार्थी दाखल झाले.
यानंतर शाळेचा विस्तार सुरू झाला. बंद पडलेल्या दुसऱ्या शाळेतील सुमारे २०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यानंतर विद्यार्थिसंख्या ३०० वरून ५५० झाली. पुढे आर्थिक अडचणी, जागेची कमतरता आणि २००५च्या पुरासारख्या संकटांवर मात करत दळवी यांनी शाळा उभी ठेवली. पाच गुंठे जागेवर ८० दिवसांत आठ खोल्यांची इमारत उभारण्यात आली. स्वतःच्या घरावर कर्ज काढून त्यातील निधी शाळेच्या बांधकामासाठी वापरल्याचे ते सांगतात.
आज त्यांच्या शाळांमध्ये सुमारे ३,५०० ते ४,००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठी कामगिरी करावी, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या मते, गेल्या काही वर्षांत दरवर्षी १०० हून अधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळवत आहेत. बालवैज्ञानिक स्पर्धेतही गेल्या पाच वर्षांत सातत्याने सुवर्णपदकासह रौप्यपदके मिळत आहेत; मात्र दळवी यांचे अंतिम ध्येय अद्याप दूर आहे. दरवर्षी १० ते २० विद्यार्थी आयआयटी-एनआयटीमध्ये जावेत आणि अखेरीस किमान २५ विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय स्तरावर क्रमांक मिळवावा, हे त्यांचे स्वप्न आहे. “ज्याला भूक असते, तो शोधतो आणि सापडवतो,” या विचारातून शिक्षणाकडे पाहणाऱ्या दळवी यांच्या मते, विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण करणारे आणि संकल्पना समजून घेण्यावर आधारित शिक्षण हीच खरी गरज आहे.
—
परदेशी भाषांचे शिक्षण
शाळेत पहिलीपासून एआय आणि कोडिंग, तर पाचवीपासून फ्रेंचसह जर्मन किंवा जपानी भाषा शिकवली जाते. अभ्यासाबरोबरच योग, ध्यान, क्रीडा आणि शंका निरसनाला वेळ दिला जातो. विद्यार्थ्यांची दप्तराची ओझी कमी करण्यासाठी पुस्तके शाळेतच ठेवण्याची पद्धतही आहे.
—
‘सी’ची त्रिसूत्री
दळवी यांच्या शिक्षणपद्धतीत कॉन्फिडन्स, कॉन्सन्ट्रेशन आणि कन्सिस्टन्सी या तीन ‘सी’ना महत्त्व आहे. विद्यार्थ्यांना मैदानाची गरज आहे, असे ते ठामपणे सांगतात. त्यामुळे वेस्टर्न रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रिकेट, फुटबॉल, धनुर्विद्या, रायफल शूटिंग, टेबल टेनिस आणि बुद्धिबळ यांसह विविध क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. चार-पाच विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर पोहोचल्याचे ते सांगतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.